रक्‍तदाब कमी होण्याची ‘ही’ आहेत कारणे? | पुढारी

रक्‍तदाब कमी होण्याची 'ही' आहेत कारणे?

प्रत्येक माणसाचा रक्‍तदाब कधी ना कधी कमी होतो. मात्र, रक्‍तदाब कमी झाल्याचा तोटा प्रत्येक व्यक्‍तीला होतो असे नाही. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार कमी रक्‍तदाबाची व्याप्‍ती अवलंबून असते. ही व्याधी दीर्घकाळापासून असल्यास आणि त्यावर उपचार न केल्यास आरोग्याच्या द‍ृष्टीने ते अत्यंत धोकादायक ठरते.

रक्‍तदाब वाढणे हे जसे आरोग्याच्या द‍ृष्टीने चांगले नसते, त्याप्रमाणे रक्‍तदाब कमी होणेही आरोग्याच्या द‍ृष्टीने हानिकारक असते. त्यामुळे अशा रुग्णांनी या व्याधीकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. हा आजार झालेल्यांनी आहाराबाबतची पथ्ये काटेकोरपणे सांभाळली पाहिजेत. ही व्याधी झालेल्यांना थकवा येणे, चक्‍कर येणे अशी लक्षणे जाणवतात. अशी लक्षणे आढळून आल्यास त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. अशी लक्षणे दिसल्यावर तातडीने डॉक्टरांचा सल्‍ला घेणे आवश्यक ठरते.

प्रत्येक माणसाचा रक्‍तदाब कधी ना कधी कमी होतो. मात्र, रक्‍तदाब कमी झाल्याचा तोटा प्रत्येक व्यक्‍तीला होतो असे नाही. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार कमी रक्‍तदाबाची व्याप्‍ती अवलंबून असते. ही व्याधी दीर्घकाळापासून असल्यास आणि त्यावर उपचार न केल्यास आरोग्याच्या द‍ृष्टीने ते अत्यंत धोकादायक ठरते.

गर्भवती स्त्रिया, जखमेनंतर भरपूर रक्‍त वाहून जाणे, हृदयरोगाचा त्रास असणे, मधुमेह, थायरॉईड अशा स्थितीमध्ये रक्‍तदाब कमी होणे आरोग्याच्या द‍ृष्टीने धोकादायक ठरते. एखाद्या व्यक्‍तीला अ‍ॅलर्जीमुळे गंभीर रिअ‍ॅक्शन येत असेल तर त्या व्यक्‍तीलाही कमी रक्‍तदाबाचे धोके सहन करावे लागतात.

1) आपण ज्यावेळी झोपतो, उठतो किंवा आडवे होतो याचाच अर्थ आपले शरीर जेव्हा परिवर्तनाच्या स्थितीत असते तेव्हा रक्‍तदाब कमी होतो. ही व्याधी कोणत्याही वयाच्या व्यक्‍तीला होऊ शकते. काही जणांना या स्थितीमध्ये डोळ्यासमोर अंधेरी येते. या स्थितीला आर्थोस्थेटिक हायपोटेन्शन म्हणतात. या स्थितीमध्ये काही जणांना वारंवार चक्‍कर येते.

2) जेवण केल्यानंतर किंवा नाष्टा केल्यानंतर अनेकांचा रक्‍तदाब एकदम कमी होतो. साठी ओलांडलेल्या व्यक्‍तींना अशा प्रकारचा त्रास जाणवतो.

3) बैठे काम करणार्‍यांना अनेकवेळ खुर्चीत बसल्यानंतर उभे राहण्याची वेळ येते तेव्हा त्यांचा रक्‍तदाब कमी होतो. ही व्याधीही ज्येष्ठ नागरिकांमध्ये जाणवते. अनेकांना आपल्या भावना आवरत नाहीत. त्यावेळीही त्यांचा रक्‍तदाब कमी होतो, असे दिसते.

4) शरीरातील एखाद्या भागाला ऑक्सिजन आणि रक्‍ताचा पुरवठा योग्य प्रमाणात झाला नाही तर त्या भागाला शॉक बसल्यासारखे वाटू लागते. या व्याधीचा उपचार योग्य पद्धतीने केला नाही तर ही व्याधी जीवघेणी ठरू शकते. वारंवार थकवा जाणवणे, एखाद्या भागाची संवेदना हरपणे, द‍ृष्टी अस्पष्ट होणे ही या व्याधीची लक्षणे सांगता येतात. याला सिव्हियर हायपोटेन्शन असे म्हणतात.

औषधे घेऊन या व्याधीपासून रुग्णाला स्वतःचा बचाव करता येतो. रक्‍तदाब नियंत्रित राहण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेत घेणे आवश्यक असते. औषधे घेण्याबाबत हलगर्जीपणा दाखवल्यास त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. काहीवेळा शरीरातील पाणी कमी झाल्यामुळेही रक्‍तदाब कमी होतो. त्यामुळे नियमित अंतराने पाणी पिणे आवश्यक असते.

डॉ. भारत लुणावत

Back to top button