

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : पवनी तालुक्यातील चन्नेवाडा जंगल शिवारातील कृत्रिम तलावात अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणाचा उलगडा करण्यात पवनी पोलिसांना यश आले आहे. या महिलेचा खून करुन मृतदेह तलावात फेकण्यात आला होता.
याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. अनैतिक संबंधातून महिलेची हत्या करण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे.
ओमप्रकाश खोब्रागडे (वय ४५) रा. चन्नेवाडा असे आरोपीचे नाव असून मृतक महिलेचे नाव चित्रासेन बीसेना रा. नागपूर (३५) असे आहे.
अधिक माहिती अशी की, आरोपी ओमप्रकाश खोब्रागडे हा मौजा चन्नेवाडा येथील रहिवासी असून कामाच्या शोधात नागपूरला काही दिवसाआधी जाऊन ठेकेदारी व्यवसाय करीत होता.
दरम्यान चित्रासेन बीसेना ओमप्रकाशकडे कामावर होती. पुढील दिवसांमध्ये दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.
ओमप्रकाशचे कुटुंब नागपूरला त्याच्याजवळ असल्याने तो मृतक महिलेला स्वगावी चन्नेवाडा येथे घेऊन यायचा. येताना त्याच्यासोबत प्रत्येक वेळी महिला असायची, असे चन्नेवाडा येथील गावकरी सांगतात.
आरोपी व मृतक यांचे अनैतिक संबंध घट्ट होत चालले असताना कुटुंब उद्ध्वस्त होण्याची भीती ओमप्रकाशच्या मनात निर्माण झाल्याने त्याने चित्रासेन बिसेनाची हत्या करण्याचे ठरवले.
त्यासाठी त्याने दुचाकी वाहनाने चित्रासेनला १८ जुलै रोजी चन्नेवाडा येथे आणले. दोन दिवसानंतर २० जुलै रोजी सकाळी पाच वाजेदरम्यान फिरण्याच्या हेतूने तिला जंगलातील निर्जनस्थळी तलावाजवळ घेऊन गेला.
यावेळी त्याने हातात बांबूचा दंडा घेतला होता. तलावाच्या ठिकाणी पोहोचताच त्याच दांड्याने महिलेच्या डोक्यावर वार करून खाली पाडले व गळा आवळून हत्या केली.
त्यानंतर मृतदेहाला दगड बांधून तलावात फेकले. तीन दिवसानंतर २३ जुलै रोजी वनविभागाचे बिटरक्षक यांना तलावात प्रेत पाण्यावर तरंगताना आढळल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रेताला ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात आणले. मात्र पोस्टमार्टम करण्याला शरीर योग्य नसल्याने विसेरा चाचणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आल्याचे पत्रपरिषदेत ठाणेदार जगदीश गायकवाड यांनी सांगितले.
या महिलेची हत्या की आत्महत्या हे शोधून काढणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते.
जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक जगदीश गायकवाड यांनी तपासाचे सूत्रे चालविले.
गावातून मिळालेल्या गोपनीय माहितीचा आधार घेऊन तसेच घटनास्थळ विचारात घेऊन आरोपीपर्यंत पोहोचण्यात तपास यंत्रणेला यश आले. पोलिस पथकाने नागपूर गाठून आरोपीला पकडले.
विचारपूस करीत असतांना आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यामुळे त्याला पवनीला आणण्यात आले.
मृतदेक मिळाल्यापासून तीन दिवसात पोलिसांनी आरोपींचा शोध लावल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे. सदर प्रकरणात पोलिसांनी भादंविच्या ३०२, २०१ कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली.