राज्यपाल म्हणाले पूरस्थितीचा अहवाल राष्ट्रपतींसह केंद्रीय गृहमंत्र्यांना देणार | पुढारी

राज्यपाल म्हणाले पूरस्थितीचा अहवाल राष्ट्रपतींसह केंद्रीय गृहमंत्र्यांना देणार

चिपळूण ; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपतींनी आपल्याला चिपळूणची पूरपरिस्थिती पाहण्यास जावे, असे सांगितल्यानंतर आपण तातडीने चिपळूणमध्ये आलो आहोत. पुरामुळे चिपळूणची झालेली दयनीय अवस्था पाहिली. याबाबत आपण राष्ट्रपतींसह केंद्रीय गृहमंत्र्यांना माहिती देणार असून लवकरच केंद्राचे पथकही चिपळूणमध्ये येऊन पाहणी करणार आहे. त्यानंतर शासन योग्य तो निर्णय घेईल, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी चिपळुणातील पूरग्रस्तांना आश्‍वासित केले.

चिपळूणच्या इतिहासात महापुराच्या निमित्ताने राज्यपाल प्रथमच शहरात आले होते. गुहागर येथे त्यांचे आगमन झाले. त्यानंतर मोटारीने दुपारी 3 वा. त्यांचा ताफा चिपळुणात दाखल झाला. राज्यपाल येणार म्हणून कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

गुहागर बायपासमार्गे राज्यपाल यांचे चिपळूणमध्ये आगमन झाले. मध्यवर्ती बसस्थानक मार्गे चिंचनाका येथे ताफा दाखल होताच रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी झाली होती.

त्यांना आवरण्यासाठी पोलिसांनी कडेकोट सुरक्षा ठेवली होती. चिंचनाका येथून मार्कंडीकडे जाणार्‍या रस्त्याने पाहणी केली. या वेळी ट्रेड सेंटर येथे व्यापार्‍यांनी त्यांना निवेदन दिले.

व्यापारी शैलेश वरवाटकर व चंद्रशेखर चितळे रस्त्यात निवेदन घेऊन थांबले आहेत, हे पाहताच राज्यपाल यांचा ताफा थांबला आणि ते गाडीतून खाली उतरले. त्या नंतर राज्यपालांनी व्यापार्‍यांचे निवेदन स्वीकारले.

या वेळी व्यापार्‍यांना उद्देशून राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, राष्ट्रपतींच्या सूचनेनंतर आपण चिपळुणात आलो आहोत. या ठिकाणी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, केंद्रीय मंत्री येथे पाहणी करून गेले आहेत. शासन योग्य ती काळजी घेत आहे.

तसेच केंद्राचे पथक चिपळुणात येऊन पाहणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. व्यापार्‍यांनी विमा कंपन्यांच्या माध्यमातून होणार्‍या जाचाबाबत थेट राज्यपालांकडे तक्रार केली. या वेळी त्यांनी व्यापार्‍यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि याबाबत शासन लवकरच निर्णय घेईल, असे सांगितले.

महापुरानंतर झालेले नुकसान याची आपल्याला कल्पना आहे. आपण त्याची पाहणी करत आहोत.त्यामुळे त्यातून मार्ग निघेल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला .

Back to top button