पुणे : जिल्हाधिकारी असल्याचे सांगत महिलेकडून ५० ते ६० लाखांची फसवणूक | पुढारी

पुणे : जिल्हाधिकारी असल्याचे सांगत महिलेकडून ५० ते ६० लाखांची फसवणूक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला एजंटने स्वत: जिल्हाधिकारी व तहसीलदार असल्याचे सांगत अनेकांची लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. अनिता देवानंद भिसे ( वय ४६) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा परिसरातील प्रतिकनगर येथील उत्तम टाऊन स्केप या सोसायटीत राहणाऱ्या दुर्गेश्वरी अशोक चित्तर(४६) व त्यांचे पती अशोक चित्तर(४७) यांनी तक्रार दिली आहे.

तक्रारदार यांच्या सोसायटीत भाड्याने राहणाऱ्या महिलेने अपंगांसाठी शासकीय भुखंड मिळवून देण्याचे आमिष चित्तर दाम्‍पत्‍याला दाखवले.  त्यांची 27 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दुर्गेश्वरी चित्तर यांनी २१ जूलै रोजी येरवडा पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली. यानंतर गुन्‍हा दाखल करण्यात आला होता.

50 ते 60 लाखांची फसवणूक

संबंधीत महिलेचा पिंपरी-चिंचवड महापालिकेतही वावर असल्याने तेथेही गंडा घातल्याची शक्‍यता आहे. या महिलेविरुध्द आजपर्यंत पाच ते सहा जण तक्रारी करण्यास पुढे आले आहेत. त्यांची ५० ते ६० लाखांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न होत आहे.

या महिलेकडे जिल्हाधिकारी व तहसिलदार असल्याची बनावट कागदपत्रेही सापडली आहेत. त्या महिलेचा जिल्हाधिकारी कार्यालयात मुक्त वावर होता. या महिलेस येरवडा पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनूस शेख यांचे आदेशान्वये सहायक पोलिस निरीक्षक समीर करपे, पोलिस उप निरीक्षक हनुमंत भोसले, पोलिस हवालदार दत्ता शिंदे,पोलिस नाईक गणेश वाघ, विठ्ठल खेडकर, पार्वती भंडारी, राजेंद्र ढोणे, वर्षा सावंत यांनी दाखल गुन्ह्यातील आरोपी महिला शोध घेतला.

घरात बनावट शिक्के, बनावट कागदपत्र सापडली

ती महिला राहत्या घरात मिळून आली. घराची झडती घेतली असता घरात बनावट शिक्के, बनावट कागदपत्र तसेच काही लोकांना नोकरीस लावण्याकरिता तयार केलेले बनावट कागदपत्र मिळून आल्याने ते जप्त करुन ताब्यात घेण्यात आले आहेत.

त्या महिलेस अटक करण्यात आली असून न्यायालयाने आरोपीची पोलिस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. महिला आरोपीने अशाप्रकारे अनेक लोकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न होत आहे. ज्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी येरवडा पोलिस ठाणेमध्ये संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी अपर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, उप आयुक्त पकंज देशमुख, सहायक पोलिस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनुस शेख , पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक समीर करपे, उप-निरीक्षक हनुमंत भोसले, पोलिस हवालदार दत्ता शिंदे, पोलिस अंमलदार गणेश वाघ, विठ्ठल खेडकर, पार्वती भंडारी, राजेंद्र ढोणे, वर्षा सावंत यांनी केली.

हे ही वाचलत का :

Back to top button