भंडार; पुढारी वृत्तसेवा : Bhandara Crime धानाची वसुली करुन परत जात असताना अज्ञात सात ते आठ इसमांनी डोळ्यात मिरची पावडर टाकून व चाकुचा धाक दाखवून व्यापा-याच्या दिवाणजीजवळील तब्बल २२ लाख ६९ हजार रुपये घेवून पळ काढला. ही थरारक घटना मंगळवारी रात्री १० वाजता दरम्यान साकोली तालुक्यातील पळसगाव ते गोंडउमरी मार्गावर घडली घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
तेलंगना येथील व्यापारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात धान देतात. त्या धानाची वसुली करण्यासाठी आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा आपला दिवाणजी पाठवितात. असाच प्रकार मंगळवारी घडला.
नेहमीप्रमाणे हैदराबाद येथील एका व्यापा-याने नागपूरमार्गे आपला एक दिवाणजी वसुलीसाठी पाठविला. तो दिवाणजी नागपूर येथून मालकाकडून एमएच ४९ एएस ८३९६ कारने भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील व्यापा-याकडे वसुलीला गेला.
सुरुवातीला त्याने गोंदिया येथील एका व्यापा-याकडून वसुली केली. नंतर तो साकोली तालुक्यातील पळसगाव येथील राईस मिल मालकाकडून वसुली केली. त्यानंतर रात्रीच हैदराबादकडे जात होते. त्यावेळी त्यांच्याकडे रोख रक्कम २२ लाख ६९ हजार रुपये होते.
परतत असताना हकीम खान राताजपूर हा गाडी चालवत होता. तर त्याच्या बाजुला दिवाणजी मासेठी सीलयान भारकर (वय २९, रा. रेकुल्ला, तेलंगना) हा बसला होता. गाडी पळसगाव ते गोंडउमरीच्या मधे असताना रस्त्यावर एक अज्ञात इसम पडलेला दिसला.
त्यामुळे त्या इसमाला पाहण्यासाठी कार थांबविण्यात आली व दोघेही कारच्या खाली उतरले. कारच्या खाली उतरताच दबा धरुन बसलेल्या सात ते आठ अज्ञात इसमांनी फक्त दिवाणजी मासेठी याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली व चाकूचा धाक दाखवीत त्याच्याजवळील रोख रक्कम व मोबाइल घेऊन पसार झाले.
एवढेच नाही तर कारच्या टायरला धारदार शस्त्रानी छेद करुन टायर पंचर करुन पळून गेले. घाबरलेल्या दोघांनी तत्काळ त्यांनी पंचर गाडीने गोंदिया जिल्ह्यातील डुग्गीपार पोलिस स्टेशन गाठले. तक्रार मिळताच डुग्गीपार पोलिस स्टेशनचे पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र, सदर घटनास्थळ हे साकोली पोलिस स्टेशन हद्दीत असल्याने सदर प्रकरण त्यांनी साकोली पोलिस स्टेशनला दिली. माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला असून वृत्त लिहीपर्यंत आरोपीचा शोध लागला नव्हता.