नागपूर, पुढारी वृत्तसेवा : "काँग्रेसच्या फेरबदलाची चर्चा कुठून आली हे मला माहिती नाही. मी विधिमंडळ काँग्रेसचा नेता आहे. काँग्रेसमधील फेरबदलाबद्दल माझ्याशी पक्षश्रेष्ठी वा प्रदेश पातळीवरही अशी चर्चा झाली नाही," असे सांगत या चर्चेत तथ्य नसल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली.
चंद्रपूर येथील एका कार्यक्रमाला जात असताना त्यांनी येथे विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. "खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबई येथे उपोषण सुरू केले आहे. खरे तर मराठा आरक्षणाबाबत आम्ही बऱ्याच गोष्टीत चांगले काम केले आहे. पण आम्ही त्यांना समजावून सांगण्यात कमी पडलो आहे. तरीही त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू," असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
यासंदर्भांत ते म्हणाले, "संभाजीराजेंना उपोषन न करण्याची विनंती आम्ही केली होती. त्याबाबत न्यायालयाचे काही निर्णय आहेत. त्याची अंमलबजावणी करायची आहे. या शिवाय संभाजीराजे छत्रपती यांच्या मागण्यांवर राज्य सरकार काम करीतच आहे. मुख्यमंत्र्यांसोबत आमची बैठकही झालेली आहे. काही निर्णय झालेले आहेत. मराठा आरक्षणावर बरेच काम झाले आहे. पण खासदारांना ते सांगण्यात आम्ही अपयशी ठरलो."
सभागृहाचा अध्यक्ष वा उपाध्यक्षाची निवड झाली पाहिजे असा राज्यघटनेत उल्लेख आहे. आम्ही राज्यपालांना विनंती केली आहे. ९ मार्चला अध्यक्षांची निवड आहे. त्यात अडचण येईल असे वाटत नाही. विधानसभा अध्यक्षपदाच्या नावाबाबत शरद पवार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. त्यामुळे तो काही आता प्रश्न नाही, असे ते म्हणाले.
भाजपचे राजकारण हे लोकशाहीसाठी हानीकारक आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलले ते बरोबर आहे. 'आम्ही काय धुणीभांडी करायची काय', असेही ते म्हणाले. त्यामागील अर्थ समजून घेतला पाहिजे. भाजपचे राजकारण करण्याची पद्धत संपूर्ण देशाने पाहिली आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्हाला सत्ता हवीच, असा त्यांचा प्रयत्न असतो. लोकशाहीत सत्तेबाबत लोकांनी निर्णय घ्यायला हवा.
भाजपकडून दबावाची पद्धत योग्य नाही. हे पाहिल्यानंतर कोणीही असेच म्हणेल. सर्व समाजघटकांना बरोबर आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. काँग्रेसने नेहमी सर्व समाजाला न्याय दिला आहे. ओबीसी समाजात विजय वडेट्टीवार सातत्याने चांगले काम करीत आहेत आणि त्यांना आमची कायम साथ राहिल. असे थोरात म्हणाले.
हे ही वाचा