

दत्तवाड (जि.कोल्हापूर), पुढारी वृत्तसेवा :
राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी कागल शिरोळ तालुक्यातील गावांचा विदर्भ व मराठवाडा करणार का असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही इचलकरंजीसाठी दुधगंगा नदीवरील सुळकूड येथून होणारी योजना पूर्ण होऊ देणार नाही. असे स्पष्ट मत दूधगंगा बचाव कृती समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे. दत्तवाड तालुका शिरोळ येथे आयोजित बैठकीत सदर भूमिका सुळकुड, दत्तवाड, घोसरवाड, हेरवाड, अब्दुललाट, टाकळीवाडी, नवे व जुने दानवाड गावातील प्रमुख लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत घेण्यात आला.
इचलकरंजी शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी दूधगंगा नदीवर सुळकूड येथून नगरोत्थान योजनेतून पाणी आणण्याचे तत्वतः मंजुरी मिळाली आहे. मात्र ही मंजुरी दूधगंगा नदी काठावर मोठा अन्याय होणारी आहे.
तसेच, हा केवळ इचलकरंजी शहराचा पाण्याचा प्रश्न नाही. तर पंचगंगा नदी काठावर इचलकंजीसह अनेक गावे आहेत मग त्या गावांच्या पाण्याचा प्रश्न कसं सोडवणार? त्यापेक्षा सदर योजनेसाठी मंजूर झालेली रक्कम ही पंचगंगेचे प्रदूषण दूर करण्यासाठी खर्ची करावे. तसेच कृष्ण नदीतून होणाऱ्या पाणीपुरवठ्याची गळतीचे काम दुरुस्त करून घ्यावे, असे मत गुरुदत्त शुगरचे संचालक बबन चौगुले यांनी व्यक्त केले.
सध्या दूधगंगा नदीवर कोणतीही मोठी योजना नसतानाही दूधगंगा नदी वर्षातून चार ते पाच वेळा कोरडी पडते. शिवाय काळम्मावाडी धरण बांधताना येथील धरणग्रस्तांना दत्तवाड, घोसरवाड, हेरवाड, अब्दुललाट, अकिवाट आदी ठिकाणी विस्थापित करण्यात आले आहे. शिवाय दत्तवाड, घोसरवाड येथील नागरिकांची जवळपास पाचशे ते सहाशे एकर जमीन या विस्थापितांना देण्यात आली आहे. त्यामुळे या पाण्यावर पूर्णपणे दुधगंगा नदी काठावरील या गावांचा हक्क आहे. त्यामुळे यातील एकही थेंब इचलकरंजीला देणार नाही, अशी भूमिका पंचायत समिती सदस्य मिनाज जमादार यांनी व्यक्त केली.
यावेळी सुळकूड ते सरपंच सचिन भोसले, उपसरपंच शरद धुळगडे, दतवाडचे सरपंच चंद्रकांत कांबळे, घोसरवाडचे विजितसिंह शिंदे , गुरुदत्त शुगरचे संचालक बबन चौगुले, डी एन सिधनाले, भाजपचे तालुका उपाध्यक्ष राजगोंडा पाटील, एन एस पाटील, बाळासाहेब पाटील, बाबुराव पवार, तंटामुक्त समिती अध्यक्ष बाळासो कोकणे, आदीसह सुळकुड, दतवाड, घोसरवाड येथील ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
हे ही वाचा