ठाणेकरांची चिंता वाढली युक्रेनमध्ये अडकलेल्या संख्या दिवसेंदिवस वाढतीच | पुढारी

ठाणेकरांची चिंता वाढली युक्रेनमध्ये अडकलेल्या संख्या दिवसेंदिवस वाढतीच

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : युक्रेनमध्ये अडकलेल्या ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या शनिवारी ११ वरून ३४ वर पोहोचली आहे. यापैकी २६ विद्यार्थी एमबीबीएसचे तर उर्वरित ८ विद्यार्थी इतर विषयांचे शिक्षण घेण्यासाठी युक्रेन येथे गेले असून, याबाबत ठाणे जिल्हा प्रशासनाच्या हेल्पलाईन नंबरवर पालकांनी संपर्क साधला असल्याची माहिती जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर तेथील परिस्थिती आता अधिकच भयावह होत आहे. अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी जिल्हा स्तरावर हेल्पलाईन सुरु करण्यात आली असून, ठाणे जिल्ह्यातील  नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी केले होते.

शुक्रवारी या हेल्पलाइनवर ठाणे जिल्ह्यातील ११ पालकांनी संपर्क साधत आपली पाल्ये युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती दिली होती. शनिवारपर्यंत ३४ विद्यार्थ्यांच्या पालकांनी हेल्पलाइनवर संपर्क साधला, असे  जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. युक्रेन येथे अडकलेल्या ३४ विद्यार्थ्यांपैकी  ठाण्यातील १५, नवी मुंबई येथील ५, भिवंडी येथील ४,  कल्याण येथील ३, मीरा भाईंदर येथील २  तर डोंबिवली, मुरबाड, बोरिवली, पडघा, आणि अंबरनाथ येथील प्रत्येकी एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button