नागपूर : शक्तीमान गुंडावर जीवघेणा हल्ला; उपराजधानी हादरली | पुढारी

नागपूर : शक्तीमान गुंडावर जीवघेणा हल्ला; उपराजधानी हादरली

नागपूर; पुढारी वृत्तसेवा :

नागपुरात काही तासाच्या अवधीतच युवकाच्या हत्येतील मारेकरी शक्तीमान गुंडावर अक्कू स्टाईलने जिवघेणा हल्ला झाल्याने नागपूर हादरले. विशेष म्हणजे शुक्रवारी (दि. २३) रात्री दहाच्या सुमारास झालेल्या एका युवकाच्या हत्येत समावेश असलेल्या कुख्यात गुंडावर लगेचच आज जमावाने जोरदार हल्ला केला.

या घटनेमुळे नागपूर मध्ये गैंगवार भडकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सिने स्टाईलने “खून का बदला खून’ म्हणत रात्री झालेल्या खूनात सहभाग असलेल्या कुख्यात गुंडाचा शनिवारी सकाळी एका भल्या मोठ्या जमावानेच धारदार शस्त्र, दगड, विटा ने हत्या करण्याचा प्रयत्न केला.

अक्कू यादव हत्याकांडाची पुनरावृत्ती?

शक्तिमान नामक या कुख्यात गुंडावर हा जिवघेणा हल्ला करण्यात आला आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या गुंडाला नागपूर मेडीकल कॉलेज रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या गुंडाची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या घटनेमुळे अक्कू यादव हत्याकांडाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न झाला अशी चर्चा आहे.

शुक्रवारी रात्री अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कौशल्यानगर येथे स्वयंदीप नगराळे (वय २१) या युवकाचा खून करण्यात आला. या खूनात सहभागी कुख्यात गुंड शक्तीमान याला स्वयंदीपचे मित्र आणि परिसरातील लोकांनी हल्ला करून संपविण्याचा प्रयत्न केला.

स्वयंदीपला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवले?

गरीब कुटुंबातील असलेला स्वयंदीप वडिलांना व्यवसायात मदत करीत होता. शक्तीमानने कौशल्यानगर परिसरात स्वत:ची वेगळी गँग स्थापन करून दहशत निर्माण केली होती. या परिसरात असलेला जुगार अड्डा या हत्याकांडाचे कारण असल्याचे सांगितले जाते.

कौशल्यानगर परिसरात जुगार अड्डा चालतो. याच अड्ड्यावरून काही दिवसांपूर्वी स्वयंदीप नगराळे सोबत वाद झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार शक्तीमान उर्फ शिवम गुरूदे याने स्वयंदीपला बलात्काराच्या आरोपात अडकवले होते. तेव्हापासून त्यांच्यात कुरबुरी सुरू होत्या.

शक्तीमानकडून अल्पवयीन मुलांचा खुनात वापर

त्याच कारणावरून शुक्रवारी रात्री आपल्या घराजवळ ऑटोत बसलेल्या स्वयंदीपवर शक्तीमानने दोन अल्पवयीन आणि अन्य एका आरोपीसह येऊन त्याच्या छातीवर तीक्ष्ण शस्रांनी वार केले. एका घावातच स्वयंदीप मरण पावला. त्यानंतर आरोपी फरार झाले.

स्वयंदीपच्या खूनाची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. कोणीतरी अजनी पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार विनोद चौधरी यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींसह अन्य एका आरोपीला रात्रीच अटक केली. मात्र मुख्य आरोपी शक्तीमान फरार होता.

स्वयंदीपच्या मित्रांनी शक्तीमानच्या होते शोधात?

इकडे स्वयंदीपच्या मित्रांनी शक्तीमानचा रात्रभर शोध घेऊनही तो सापडला नाही. लोकांच्या मनात सूडाची भावना भडकली होती. शनिवारी पहाटे शक्तीमान भांडेवाडीत त्याच्या मामाकडे लपून असल्याचे समजताच लोक भांडेवाडीत जाऊन त्याला वस्तीत घेऊन आले. नंतर स्वयंदीपचा खून झाला होता त्याच्या बाजूच्या गल्लीत झेंड्याजवळ नेऊन शक्तीमान वर हल्ला करण्यात आला. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

शक्तीमान दहशत माजवण्यासाठी पुन्हा वस्तीत?

मात्र वस्तीतील काही लोकांच्या सांगण्यानुसार रात्री स्वयंदीपची हत्या केल्यानंतर शनिवारी सकाळी शक्तीमान आपली दहशत कायम करण्यासाठी वस्तीत परतला. त्याला पाहून संतापलेल्या वस्तीतील लोकांनी त्याच्यावर लाठ्या काठ्या आणि धारदार शस्त्राने हल्ला चढविला.

या हल्ल्यात तो खूप गंभीर जखमी झाला. शक्तीमान मेला असे समजून स्वयंदीपचे मित्र निघून गेले. दरम्यान घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी त्याला रुग्णालयात भरती केले. सध्या त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक एस. के. जाधव यांनी दिली.

शुक्रवारी रात्री स्वयंदीपच्या हत्येनंतरही पोलिसांनी वस्तीत बंदोबस्त लावला नव्हता. शक्तीमान परत हल्ला करील अशी भीती लोकांच्या मनात होती. त्यातून सकाळी तो वस्तीत दिसताच संतप्त झालेल्या लोकांनी त्याच्यावर हल्ला केला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला असून आरोपींची धरपकड सुरू केली आहे.

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : HRCT नेमकी कधी करावी?

Back to top button