बदलापुरात तृतीयपंथीची २५ वर्षाची गणेशोत्सवाची परंपरा 

बदलापुरात तृतीयपंथीची २५ वर्षाची गणेशोत्सवाची परंपरा 

बदलापूर, पुढारी वृत्तसेवा : देशात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती गणेशाची सर्व जणमन मनोभावे पुजा करतात. गणरायाची जातीधर्माची जशी बंधने नाहीत. तशी ती वर्ण आणि लिंग भेदाची देखील नाहीत. असाच एक बाप्पा बदलापुरातील तृतीयपंथी श्रीदेवी यांच्या घरी विराजमान झाला आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ बदलापूरच्या म्हाडा कॉलनी संभाजी नगर परिसरात राहणाऱ्या श्रीदेवी त्यांच्या घरी मोठ्या भक्तीभावाने गणरायाची प्रतिष्ठापना करतात.

तृतीयपंथी एरवी अनेक ठिकाणी सण, उत्सव आणि लग्न समारंभात नृत्य करून तर कधी भिक्षुकी करून आपले पोट भरतात. मात्र बाप्पा वर असलेल्या नितांत श्रद्धेपोटी दरवर्षी न चुकता हा समाज गणेशोत्सव साजरा करतो. दोन वर्ष कोरोनाच्या निर्बंधांमुळे गणेशोत्सव साजरा करता आला नाही. मात्र यंदा कोरोना शिवाय त्याचे निर्बंध देखील नाहीत. त्यामुळे गणरायाची पुन्हा त्याच भक्तिभावे पूजा अर्चा केल्याचे तृतीयपंथीयांचे म्हणणे आहे.

दीड दिवस तृतीयपंथीय गणपतीची मनोभावे पूजा करतात. त्याचबरोबर यल्लमा देवीची देखील पूजा केली जाते. ठाणे जिल्ह्यातूनच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातून आणि मुंबईतून देखील अनेक तृतीय पंथीय या गणपतीच्या दर्शनासाठी येतात. विसर्जन मिरवणुकीनिमित्त भंडाऱ्याचे आयोजन करून तृतीयपंथीय समाज आपला गणपती प्रती असलेली श्रद्धा व्यक्त करत असतो. बदलापूर आणि आसपासच्या भागात राहणारे नागरिकही या गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news