बाळासाहेब नाहाटा राष्ट्रवादीत जाणार, अजित पवारांच्या उपस्थितीत 3 सप्टेंबरला मेळावा | पुढारी

बाळासाहेब नाहाटा राष्ट्रवादीत जाणार, अजित पवारांच्या उपस्थितीत 3 सप्टेंबरला मेळावा

श्रीगोंदा, पुढारी वृत्तसेवा: विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे 3 सप्टेंबर रोजी श्रीगोंदा तालुका दौर्‍यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत श्रीगोंदा येथे सकाळी 11 वाजता होणार्‍या शेतकरी मेळाव्यात राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहटा व शरद नवले हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली. पक्ष प्रवेशासंबधी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस, बाळासाहेब नाहाटा, हरिदास शिर्के, विवेक पवार पाटील, शरद नवले, कल्याण जगताप आदी उपस्थित होते. घनश्याम शेलार म्हणाले, विरोधी पक्षनेते झाल्यानंतर अजित पवार प्रथमच श्रीगोंदा तालुक्याच्या दौर्‍यावर येत आहेत. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

अजित पवार यांच्या हस्ते सकाळी दहा वाजत मढेवडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या नूतन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. अकरा वाजता पारगाव सुद्रिक येथील सुद्रिकेश्वर सोसायटीच्या नूतन कार्यालय, शॉपिंग सेंटर इमारतीचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर श्रीगोंदा येथे शेतकरी मेळावा होणार आहे.

मगर, शेलारांचा प्रवेश थांबला

श्रीगोंद्यातील शेतकरी मेळाव्यात नाहाटा यांच्यासह केशव मगर, अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब गिरमकर, संजय जामदार हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते. पण, राज्यात सत्तांतरामुळे त्यांचा राष्ट्रवादीमधील प्रवेश थांबला आहे, असे नाहाटा यांनी सांगितले.

आगामी आमदार राष्ट्रवादीचा

अजित पवार यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एकाच वेळी राज्य बाजार समिती महासंघ, मुंबई बाजार समितीवर संधी दिली. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय घेतला. अजित पवारांचे श्रीगोंदा तालुक्यावर विशेष लक्ष आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. सन 2024 चा आमदार हा राष्ट्रवादीचाच असेल, असेही नाहाटा म्हणाले

Back to top button