रोहित पवार फडणवीसांना भेटले! मतदारसंघातील कामांना गती देण्याची मागणी; महत्त्वाच्या विषयांवर चर्चा | पुढारी

रोहित पवार फडणवीसांना भेटले! मतदारसंघातील कामांना गती देण्याची मागणी; महत्त्वाच्या विषयांवर चर्चा

जामखेड, पुढारी वृत्तसेवा: आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, मतदारसंघातील बंधारे आणि डिंभे-माणिकडोह बोगद्याच्या कामाला गती देण्याची मागणी केली आहे. मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी सरकारकडून सहकार्य मिळेल, असा विश्वास आ.पवार यांनी या भेटीनंतर व्यक्त केला. आ. रोहित पवार म्हणाले, सरकार हे कोणत्या पक्षाचे नसते, तर संपूर्ण जनतेचे असते. त्याअनुषंगाने मतदारसंघातील विविध प्रश्न सरकार दरबारी मांडून ते सोडविण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. डिंभे-माणिकडोह बोगदा आणि बंधार्‍यांची कामे माझ्या मतदारसंघातील शेतकर्‍यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यामुळे या कामांना गती देण्याची मागणी आपण केली आहे.

डिंबे-माणिकडोह बोगद्याला महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजुरी मिळाली आहे. पावसाळ्यात डिंभे धरणातून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी हे या बोगद्याद्वारे माणिकडोह धरणात साठविता येणार आहे. यामुळे कर्जतसह पारनेर, श्रीगोंदा आणि करमाळा या तालुक्यांना कुकडी प्रकल्पातून एक अतिरिक्त आवर्तन मिळेल. शिवाय पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर या तालुक्यांचा पाण्याचा कोटाही अबाधित राहणार आहे. यासोबतच कुकडी प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींचा मोबदला अद्यापही अनेक शेतकर्‍यांना मिळाला नाही. यातील अडचणी दूर करण्यासाठी बैठक घेण्याची मागणीही त्यांनी यावेळी फडणवीस यांच्याकडे केली.

लातूर पद्धतीने होणार बंधारे जिल्ह्यातून वाहणार्‍या सीना नदीवर एकूण पंधरा कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहेत. त्यापैकी कर्जत तालुक्याच्या 6, तर आष्टी तालुक्यात 9 बंधारे आहेत. या बंधार्‍याच्या लोखंडी दरवाजाची पद्धत कालबाह्य झाली आहे. देखभाल दुरुस्ती अभावी या बंधार्‍यात पाणीसाठा होत नाही. त्यामुळे या बंधार्‍यांचे लातूर पद्धतीच्या बंधार्‍यात रुपांतर करण्यास महाविकास आघाडी सरकारने मंजुरी दिली असून, त्याचा प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम सध्या सुरू आहे.

Back to top button