जितेंद्र आव्हाड यांना अटक व सुटका; अनंत करमुसे अपहरण व मारहाण प्रकरण  | पुढारी

जितेंद्र आव्हाड यांना अटक व सुटका; अनंत करमुसे अपहरण व मारहाण प्रकरण 

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात सोशल मीडिया मध्ये सातत्याने आक्षेपार्ह पोस्ट करून बदनामी केल्याप्रकरणी ठाण्यातील अनंत करमुसे यांना वर्षापूर्वी नामदार जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशावरून त्यांच्या पोलिस अंगरक्षकांनी घरातून उचलून मंत्र्यांच्या बंगल्यात मारहाण केली होती. याप्रकरणी आज वर्तकनगर पोलिसांनी नामदार जितेंद्र आव्हाड यांना अटक केली. त्यांची दहा हजारांच्या जामिनावर मुक्तता झाली. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नामदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात सातत्याने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे घोडबंदर रोड परिसरात राहणारे अनंत करमुसे हे शिव प्रतिष्ठान संघटनेचे कार्यकर्ते आहेत. त्यांचे आव्हाड यांच्या अंग रक्षकांनी अपहरण करून आव्हाड यांच्या बंगल्यावर नेले आणि जबर मारहाण केली.

ही मारहाण आव्हाड यांच्या समोर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाने राजकीय वळण घेतले आणि कारवाईसाठी भाजपच्या नेत्यांनी राज्यपाल यांच्याकडे धाव घेऊन दोषी पोलिस आणि नामदार आव्हाड यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्यानंतर दोषी पोलिसांना अटक करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील झाली होती. मात्र आव्हाड यांच्यावर कारवाई न झाल्याने करमुसे आणि भाजपच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवून अटकेची मागणी लावून धरली होती. अखेर नामदार आव्हाड हे गुरुवारी स्वतःहून सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वर्तकनगर पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला त्यांना नंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायमूर्तींनी त्यांना १० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली. तसेच एक जामीनदार ही होता.

आजच म्हाडाच्या घरांची मोठी सोडत पार पडली होती. त्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आव्हाड यांच्या अटक व सुटेकची माहिती सोशल मीडियावर व्हायरल करून एकच खळबळ उडवून दिली.

Back to top button