

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागल्याने राज्य सरकारने शाळांसह मंदिरे, चित्रपटगृहे व नाट्यगृहे खुली करण्यास मुभा दिली आहे. मात्र राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत मुंबईत कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण अधिक असल्याने निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय लांबणीवर पडू शकतो. या आठवड्यात राज्य सरकार व टास्क फोर्ससोबत चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुंबई पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.
त्याचबरोबर ठाणे महापालिका क्षेत्रात शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत येत्या चार दिवसांत बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. नवी मुंबईत महापालिकेची चाचपणी सुरू असून, येथेही शाळा उघडण्यास प्रतीक्षा करावी लागणार आहे.
नवरात्र उत्सव व दसरा तोंडावर असताना निर्बंध हटवल्यास शहरात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर येणारी दिवाळी यामुळे मार्केट व अन्य ठिकाणी नागरिक पुन्हा गर्दी करतील. हे टाळण्यासाठी निर्बंध जैसे थे ठेवणे आवश्यक असल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकार्यांचे म्हणणे आहे.
शाळा, मंदिरे, चित्रपट व नाट्यगृहे काही निर्बंध लादून उघडण्यास परवानगी दिली तरी, या निर्बंधाची अंमलबजावणी होणे अशक्य आहे. त्यामुळे किमान मुंबई शहरात तरी निर्बंध हटवण्याबाबत पुनर्विचार व्हायला हवा, असेही या अधिकार्यांचे म्हणणे आहे. याबाबत पालिका प्रशासन राज्य सरकारसोबत चर्चा करणार असल्याचे समजते.
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दररोज 200 पेक्षा खाली गेली होती. मात्र गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पुन्हा 450 ते 500 रुग्णांची दररोज नोंद होत आहे. इमारतींमध्ये रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याचे स्पष्ट होते. कोरोना रुग्णांची रोजची संख्या 100 पेक्षा कमी होत नाही, तोपर्यंत शहरातील संपूर्ण निर्बंध हटवणे धोकादायक ठरू शकते. निर्बंध हटवल्यास पालिकेसह पोलिसांचेही नागरिक व व्यवसायिकांवर नियंत्रण राहणार नाही.
त्यामुळे मुंबई शहर व मुंबई शहराच्या आजूबाजूला असलेल्या ठाणे, मिरा-भाईंदर, नवी मुंबई, पनवेल, वसई-विरार, कल्याण डोंबिवली आदी शहरांतील निर्बंध हटवण्यापूर्वी पुन्हा आढावा घेणे आवश्यक असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे मुंबई शहरासह आजूबाजूच्या शहरांसंदर्भात राज्य सरकार कोणता निर्णय घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही.येत्या दोन ते तीन दिवसांत बैठक घेऊन शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे.
ठाणे मनपाच्या स्वतःच्या 121 शाळा आहेत. महाराष्ट्र सरकारची शिक्षण विभागाची 1,शासकीय अनुदानित 84 शाळा, तर काही प्रमाणात अनुदानित 33 शाळा आणि विनाअनुदानित खासगी शाळांची संख्या 28 आहे. तर शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या अनुदानित 3 शाळा, सरकारकडून कोणत्याही पैशाविना ज्याला स्वयंअर्थ सहाय्यित असलेल्या इंग्रजीच्या 178, हिंदी 4 , 2 मराठी अशा एकून 184 शाळा आहेत. मान्यताप्राप्त नसलेल्या शाळाची संख्या इंग्रजीच्या 38, हिंदीच्या 8, मराठीच्या 7 आणि उर्दूच्या 2 अशा एकूण 55 शाळा आहेत.
नवी मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे 8 वी ते 12 वीपर्यंत शासकीय आणि खासगी अशा 279 शाळा सुरू होण्याचा मार्ग धूसर आहे. शाळातील इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष भरण्याबाबत शिक्षण विभागामार्फत चाचपणी सुरु आहे. याशिवाय शहरातील चित्रपटगृहे आणि विष्णुदास भावे नाट्यगृह यांच्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पुढारीशी बोलताना सांगितले. त्यामुळे नवी मुंबईतील विद्यार्थ्यांना अजूनही शाळेची घंटा वाजण्याची प्रतीक्षा कायम असल्याचे चित्र आहे.