ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ला हा दुःखद आहे, मात्र अशा प्रकारचा हल्ला करणाऱ्याची हिंमत ठेचून काढली पाहिजे असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. आमचे आंदोलन हे अधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात नसून अनाधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात असल्याचे सांगून पोलिस आणि न्यायालय उचित कारवाई केली जाईल असा आम्हाला विश्वास असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.
महानगरपालिका क्षेत्रात फेरीवाल्याने केलल्या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात जाऊन भेट घेतली. राज ठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि पक्षाकडून फेरीवाल्यांबाबत योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.
त्यानंतर राज ठाकरे यांनी ठाण्याच्या पोलीस उपायुक्तांशीही चर्चा करुन संपूर्ण घटनेची माहिती घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पोलिसही त्या फेरीवाल्यावर कठोर कारवाई करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तसंच कल्पिता पिंपळे यांना तुम्ही लवकर बऱ्या व्हा असंही सांगितल्याचं ते म्हणाले.
"दोन गोष्टी आपण पाहणे महत्त्वाचे आहे. एक अधिकृत फेरीवाले आणि दुसरं अनधिकृत फेरीवाले. कालही मी म्हटलं त्याप्रमाणे जे काही घडलंय त्याचं दु:ख आहे. पण काळही सोकावतो. अशा प्रकारची हिंमत ठेचणं गरजेचं आहे.
पोलिस त्यांची कारवाई करत आहेत. न्यायालयदेखील त्यांचं कर्तव्य बजावेल अशी पूर्ण अपेक्षा आहे. पोलिसांनी त्यांची कारवाई केली आहे त्या व्यक्तीला कठोर शिक्षा होईल," असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करताना एका फेरीवाल्यानं ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता.
फेरीवाल्याने कोयत्याने केलेल्या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची दोन बोटे तुटली आणि त्यांच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे.
कल्पिता पिंपळे सध्या ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल असून नुकतीच त्यांच्या बोटांवर यशस्वी शस्त्रक्रिया देखील झाली आहे.
ठाकरे यांनी याआधीच कृष्णकुंजवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याबाबत संताप व्यक्त केला होता. कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला केलेला फेरीवाला पोलिसांच्या तावडीतून सुटला की मनसैनिक त्याला चोप देतील असं रोखठोक विधान राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर आज राज ठाकरे कल्पिता पिंपळे यांच्या भेटीसाठी ठाण्यात पोहोचले होते.