मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले; मंदिरे, दहीहंडीसाठी आंदोलने करण्यापेक्षा कोरोना विरोधात आंदोलन उभारा - पुढारी

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले; मंदिरे, दहीहंडीसाठी आंदोलने करण्यापेक्षा कोरोना विरोधात आंदोलन उभारा

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : दहीहंडी उत्सवासाठी तसेच मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने करून सर्वसामान्य जनतेचा जीव धोक्यात घालणाऱ्यानी कोरोनाच्या विरोधात आंदोलने उभी करावी, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मनसेला लगावला आहे.

स्वतः केंद्रानेच तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या काळात सतर्क राहण्याचे आवाहन करून राज्याला पत्र दिले आहे. त्यामुळे राज्य सरकार हे हिंदुत्व आणि हिंदूंच्या विरोधातील सरकार नसल्याचे यावेळी मुख्मंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

ठाण्यात संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, आमदार रविंद्र फाटक, महापौर नरेश म्हस्के यांच्यासह संस्कृती युवा प्रतिष्ठानचे प्रमुख तथा आमदार प्रताप सरनाईक हे देखील उपस्थित होते. शिवसेनेच्या माध्यमातून आजही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण केले जात आहे.

याच २० टक्के राजकारणातून सत्तेच्या माध्यमातून जनतेची सेवा केली जात आहे. परंतु इथे जनतेसाठी काही करायचे नाही, उलट १०० टक्के राजकारण करुन जनतेचा जीव धोक्यात घालून ते जगले काय किंवा त्यांना काही झाले तरी त्याची पर्वा या यात्रा काढणाऱ्यांना नसल्याची टीका देखील त्यांनी भाजपचे नाव न घेता केली.

आम्ही जे ठरवितो ते करतोच त्यासाठी तारीख पे तारीख देत नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. तर सरनाईक यांच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या ऑक्सीजन प्लांटचे त्यांनी यावेळी कौतुकही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा टास्क फोर्सने दिला आहे. तरी देखील आंदोलने, यात्रा काढून जनतेचा जीव धोक्यात घालण्याचे काम अशा महाभागांकडून सुरु असल्याची टीका देखील त्यांनी भाजपवर केली. नवीन सुविधा द्यायच्या नाहीत, परंतु जनतेची जीव धोक्यात घालून यात्रा काढायच्या हाच उद्देश भाजपचा असल्याचा टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.

परंतु शिवसेनेची शिकवण आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कार आमच्यात आजही जिवंत असल्याने शिवसेनेच्या माध्यमातून अॅम्ब्युलेन्स, ऑक्सीजन प्लांट व इतर सेवा उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे काही करायचेच असेल तर या सुविधा उभ्या करा असा सल्ला देतांनाच त्यासाठी हिम्मत असावी लागते असेही त्यांनी यावेळी सांगितले.

तर पुन्हा कडक निर्बंध घालावे लागतील; नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा

नागरिकांनी शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करावे अन्यथा पुन्हा एकदा कडक निर्बंध घालावे लागतील असा इशारा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण काही प्रमाणात वाढताना दिसत आहेत. त्यात टास्क फोर्सने देखील तिसऱ्या लाटेची शक्यता दर्शवली असल्याने नागरिकांनी नियम पळाले नाहीत तर निर्बंध पुन्हा एकदा घालावेच लागतील असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

ठाण्यात संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात आलेल्या ऑक्सीजन प्लांटचे लोकार्पण ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना शिंदे यांनी हा इशारा दिला आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने अधिक चिंता वाढविली होती. त्यावेळेस ऑक्सीजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवला होता. परंतु राज्य सरकाराने केलेल्या कामामुळे आणि नागरिकांनी घेतलेल्या काळजीमुळे ही लाट थोपविता आलेली असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

याच कालावधीत विविध महापालिका हद्दीत एक ते दोन ऑक्सीजनचे प्लांट देखील उभारण्यात आले आहेत. त्यासाठी राज्य शासन आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून देखील निधी देण्यात आला आहे. परंतु आता तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात आलेला आहे. टास्क फोर्सने देखील या विषयी सर्तकर्तेच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

हे ही वाचलत का :

“खेळ व खिलाडूवृत्ती जोपासताना”

Back to top button