कल्याण-मुरबाड महामार्गावरील खड्ड्याने घेतला शिवसैनिकाचा बळी | पुढारी

कल्याण-मुरबाड महामार्गावरील खड्ड्याने घेतला शिवसैनिकाचा बळी

डोंबिवली: पुढारी वृत्तसेवा : कल्याण-मुरबाड महामार्गावरील म्हारळ-वरप-कांबा पट्ट्यात पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांनी कांबा-पावशेपाडा गावातील ६५ वर्षीय शिवसैनिक नारायण भोईर यांचा बळी घेतला. या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. या रस्त्याच्या कामाचा ठेकेदार आणि नॅशनल हायवे ऑथरटीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भोईर कुंटुबियांनी केली आहे.

शेतकरी असलेले नारायण भोईर आज सकाळी दुधाच्या रिकाम्या झालेल्या किटल्या घेऊन आपल्या दुचाकीने उल्हासनगरहून घरी येत होते. म्हारळ पाड्याजवळ येताच तेथील लहान मुलांना वाचविताना ते खड्ड्यात पडले. तरीही स्वतःला सावरत त्यांनी दुचाकी उभी केली. मात्र, यामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाली हाेती. स्थानिकांनी तत्काळ त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवले.  प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना कल्याणच्या खडकपाड्यातल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नारायण यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व नातवंडे असा परिवार आहे.

पहिल्याच पावसाने कल्याण-मुरबाड महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. म्हारळपाडा, ओमकारनगर, सीमा रिसॉर्ट, बजरंग हार्डवेअर, सेक्रेट हार्ट स्कूल, टाटा पॉवर हाऊस, कांबा पेट्रोल पंप, पावशेपाडा बस थांबा, पाचवा मैल या परिसरात मोठ्या प्रमाणात जीवघेणे खड्डे पडले आहेत. म्हारळ पाडा ते पाचवा मैल दरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे. परंतु ठेकेदारांच्या चुकीच्या व नियोजनशुन्य कामांमुळे वाहनचालकांसह या परिसरातील नागरिकांना रस्त्यावरील खड्डे चुकवत, चिखल तुडवत ये-जा करावी लागते.

दरम्यान, या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारासह त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या नॅशनल हायवे ऑथरटीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नारायण भोईर यांचा पुतण्या, माजी पोलीस पाटील संजय भोईर यांनी केली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button