केज येथे भिंतीला भगदाड पाडून मोबाईल शॉपीत चोरी ! | पुढारी

केज येथे भिंतीला भगदाड पाडून मोबाईल शॉपीत चोरी !

केज गौतम बचुटे : केज येथील ऐन रहदारीच्या ठिकाणी असलेल्या केज-कळंब रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील श्रीराम मोबाईल शॉपीची मागील बाजूच्या भिंतीला भगदाड पाडून चोरी झाली. मोबाईल शॉपीतील चोरीचा तपास लावण्यासाठी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. घटनास्थळी आढळलेला टॉवेल श्वानला हुंगण्यास दिला असता श्वानाने जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणा शेजारी असलेल्या मस्जिद परिसर आणि केज-कळंब रोड जवळ माग काढला.

या बाबतची माहिती अशी की, केज येथील केज-कळंब आणि केज-बीड रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ पोलीस ठाण्यापासून अवघ्या दोनशे ते अडीचशे मीटर अंतरावर सचिन ज्ञानोबा देशमुख (रा. वरपगाव ता. केज ह. मु. केज) यांचे मोबाईल विक्री व दुरूस्तीचे श्रीराम मोबाईल शॉपी आहे. दि. २ जुलै शनिवार रोजी मध्यरात्री २:०० च्या सुमारास चोरट्यानी मागील बाजूच्या भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश केला. मोबाईल शॉपीतील मोबाईल, हेड फोन, ब्ल्यू टूथ, पॉवर बँक, चार्जर आणि चार्जिंग कॉर्ड असे सुमारे एक लाख रु किमतीचे मोबाईल व साहित्य लंपास केले.

श्रीराम मोबाईल शॉपीत तिजोरी असून त्यात महागडे व नामांकित कंपन्यांचे मोबाईल ठेवलेले होते. चोरट्यांना तिजोरी फोडता न आल्यामुळे लाखो रुपयांची चोरी टळली. मोबाईल शॉपीत सीसीटीव्ही असून चोरट्यानी आत प्रवेश केल्या नंतरच्या हालचाली त्यात कैद झालेल्या आहेत. एकाच्या तोंडावर मास्क आहे तर दुसऱ्याने कापडाने तोंड झाकले आहे.

हेही वाचा

Back to top button