IND vs ENG 5th Test : भारताची पहिल्या डावात ४१६ धावांपर्यंत मजल | पुढारी

IND vs ENG 5th Test : भारताची पहिल्या डावात ४१६ धावांपर्यंत मजल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीतील दुसर्‍या दिवशी भारताने पहिल्या डावात ४१६ धावांपर्यंत मजल मारली. ( IND vs ENG 5th Test ) पहिल्‍या डावात इंग्‍लंडच्‍या जेम्‍स एंडरसन याने पाच बळी घेतले. दरम्‍यान, इंग्‍लंडच्‍या पहिल्‍या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर एलेक्‍स लीस याला टीम इंडियाचा कर्णधार बुमराहने क्‍लीन बोल्‍ड केले. यानंतर पावसाच्या व्‍यत्‍ययामुळे खेळ थांबविण्यात आला.

कसोटी सामन्‍यांच्‍या इतिहासात भारतीय संघाने १०० धावांच्‍या आत पाच बळी गेल्‍यानंतर ४०० हून अधिक धावा केल्‍याचा हा तिसरा सामना आहे. १९८३ मध्‍ये भारताने वेस्‍ट इंडिजविरोधात ९२ धावांवर ५ विकेट गमावल्‍या होत्‍या. त्‍यानंतर तळातील फलंदाजांनी केलेल्‍या कामगिरीमुळे भारताने ४५१ धावांपर्यंत मजल मारली होती २०१३ मध्‍येही वेस्‍ट इंडिजविरुद्‍ध निम्‍मा संघ ८३ धावांवर तंबूत परतला होता. यानंतरही भारताने ४५३ धावा केल्‍या होत्‍या. यानंतर इंग्‍लंडविरुद्‍ध सुरु असलेल्‍या सामन्‍यात भारताने ९८ धावांवर पाच गडी गमावले होते. तरीही ऋषभ पंत  आणि जडेजाच्या द्विशतकी भागीदारीने डाव सावरत भारताने ४१६ धावांपर्यंत मजल मारली.

IND vs ENG 5th Test : रवींद्र जडेजाचे शतक

पहिल्‍या दिवशी खेळ संपला तेव्‍हा भारताने सात गडी गमावत ३३८ धावांची खेळी केली होती. दुसर्‍या दिवशीचा खेळ सुरु झाल्‍यानंतर रवींद्र जडेजाने शतकी खेळी पूर्ण केली. जडेजाने १९४ चेंडूत १३ चौकारांच्‍या मदतीने १०२ धावा फटकावल्‍या. त्‍याला जेम्‍स एंडरसन याने त्रीफळाचीत केले. जडेजाने पंत बरोबर २२२ धावांची तर शमी बरोबर ४८ धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेचाचे कसोटीतील हे तिसरे शतक आहे.

कर्णधार बुमराहची दमदार फटकेबाजी

शमी १८ धावांवर बाद झाला. त्‍याला स्‍टुअर्ट ब्रॉडने जॅक लीचकडे झेल देण्‍यास भाग पाडले. यानंतर जसप्रीत बुमराह आणि मोहम्‍मद सिराज यांनी दमदार फलंदाजी केली. स्‍टुअर्ट ब्रॉडच्‍या षटकात बुमराहने ३० धावा ठोकल्‍या. कर्णधार बुमराहने चार चौकारांसह दोन षटकार लगावले. यानंतर ब्रॉडने टाकलेल्‍या वाईडवर पाच धावा मिळाल्‍या.

 बुमराहने इंग्‍लंडला दिला पहिला धक्‍का

भारतीय संघाने पहिल्‍या डावात इंग्‍लंडला ४१६ धावांचे आव्‍हान दिले. मात्र इंग्‍लंडच्‍या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर एलेक्‍स लीस यांना टीम इंडियाचा कर्णधार बुमराहने क्‍लीन बोल्‍ड केले. यानंतर पावसामुळे खेळात व्‍यत्‍यय आला.

ऋषभ पंतचे शतक ; जडेजासह द्विशतकी भागीदारीने डाव सावरला

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीत पावसाने बाधित झालेल्या पहिल्या दिवशी भारताने शंभरीच्या आतच पाच विकेट गमावल्या होत्या. पण यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत (146) आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा (नाबाद 83) यांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या 222 धावांच्या भागीदारीमुळे भारताने पहिल्या दिवसअखेरीस 7 बाद 338 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन याने 3 विकेट घेतल्या. पावसामुळे पहिल्या दिवशी 73 षटकांचाच खेळ झाला; तर 17 षटकांचा खेळ वाया गेला.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी शुक्रवारपासून एजबेस्टन येथे सुरू झाली. गेल्या वर्षी भारताने केलेल्या इंग्लंड दौर्‍यातील पाचवा सामना कोरोनामुळे स्थगित करण्यात आला होता. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितच्या अनुपस्थितीत चेतेश्‍वर पुजारा आणि शुभमन गिलने डावाची सुरुवात केली. दोघांनी सावध खेळी करत पाच षटकांत 18 धावांवपर्यंत मजल मारली. जेम्स अँडरसनने भारताला पहिला धक्‍का दिला. त्याने 17 धावा करणार्‍या शुभमन गिलला स्लीपमध्ये झेल देण्यास भाग पाडले. गिल बाद झाल्यानंतर चेतेश्‍वर पुजारा आणि हनुमा विहारीने भारताचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण अँडरसनने भारताची भिंत म्हणून ओळखल्या जाणार्‍या चेतेश्‍वर पुजाराला 13 धावांवर बाद करत भारताला दुसरा धक्‍का दिला. ढगाळ वातावरणाचा फायदा घेत जेम्स अँडरसनने वेगवान गोलंदाजी करीत भारतीय फलंदाजांना बॅकफूटवर ढकलले. चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर आलेल्या विराट कोहलीने सातव्या चेंडूवर आपले खाते उघडले. मात्र त्यानंतर पावसाला सुरुवात झाल्याने सामना थांबवण्यात आला. त्यानंतर पंचांनी उपाहाराची घोषणा केली.

पावसानंतर खेळ सुरू झाल्यानंतर मॅटी पॉटसने भारताला दोन धक्के दिलेे. त्याने 20 धावा करणार्‍या हनुमा विहारीला पायचित बाद केले. विहारीपाठोपाठ 11 धावा करणार्‍या विराट कोहलीला देखील बोल्ड करत भारताला पॉटसने चौथा धक्‍का दिला. या महत्त्वाच्या सामन्यात रोहित आणि राहुल यांच्या अनुपस्थितीत विराटकडून मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु तो या सामन्यातही अपयशी ठरला. यानंतर जेम्स अँडरसनने श्रेयस अय्यरला 15 धावांवर बाद करत पाचवा धक्‍का दिला. अँडरसनची ही आतापर्यंतची तिसरी शिकार होती.
मात्र त्यानंतर ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा या डावखुर्‍या जोडीने भारताचा डाव 5 बाद 98 धावांपासून सावरायला सुरुवात केली. ऋषभ पंतने आक्रमक फलंदाजी करत धावांची गती वाढवली. तर दुसर्‍या बाजूने जडेजाने त्याला सावध पवित्रा घेत चांगली साथ दिली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी करत दिवसाच्या तिसर्‍या सत्रात भारताला 200 चा टप्पा पार करून दिला.

ऋषभ पंतने आपले कसोटीतील पाचवे शतक ठोकले. त्याने 89 चेंडूंतच शतकी खेळी पूर्ण केली. त्या पाठोपाठ जडेजाने देखील अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी सहाव्या विकेटची भागीदारी 150 पार नेली तसेच भारताच्या 250 धावा देखील धावफलकावर लावल्या. दमलेल्या इंग्लिश गोलंदाजांची त्यानंतरही पंत आणि जडेजाने धुलाई कायम ठेवत आपली भागीदारी द्विशतकापर्यंत नेली. याचबरोबर भारताने 300 चा टप्पा पार केला. अखेर ऋषभ पंतचा झंझावात पार्टटाईम गोलंदाज जो रूटने रोखला. त्याने पंतला 146 धावांवर बाद करत भारताला सहावा धक्‍का दिला. त्याच्या जागी आलेला शार्दुल ठाकूर (1) लगेच बाद झाला. त्यानंतर जडेजाने मोहम्मद शमीच्या साथीने दिवस खेळून काढला.

Back to top button