Chandrakant Patil : राष्ट्रवादीचे चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आंदोलन | पुढारी

Chandrakant Patil : राष्ट्रवादीचे चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आंदोलन

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : खासदार सुप्रिया सुळे यांनी घरात बसून स्वयंपाक करावा; आरक्षण द्या, नाहीतर मसणात जा, अशी टीका करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला.

बुधवारी राष्ट्रवादीच्या ओबीसी परिषदेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राची फसवणूक झाली असल्याचे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार आहात ना, समजत नसेल, तर घरात बसा, स्वयंपाक करा. दिल्लीत जा, अशी टीका चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली होती. त्याविरोधात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात जोरदार आंदोलन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात घोषणा दिल्या. ज्यांना स्वतःच्या गावातील उमेदवारी वाचविता येत नाही, संन्यास घेण्याची घोषणा करून पराभवानंतरही तोंड वर करून काहीही बरळत आहेत, त्या चंद्रकांत पाटील यांना मनोविकारतज्ज्ञांकडे नेण्याची गरज आहे, अशी टीका करीत चंद्रकांत पाटील यांचा प्रतिकात्मक पुतळाही जाळण्यात आला.

याप्रसंगी आनंद परांजपे म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना स्वयंपाक करण्याचा सल्ला देऊन देशातील तमाम मायभगिनींचा अवमान केला आहे. २१ व्या शतकात देशातील महिलांनी चूलमूल ही संकल्पनाच मोडीत काढून सर्वच क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. त्या महिलांना पुन्हा चूलमूल या संकल्पनेत अडकाविण्याची चंद्रकांत पाटील यांची मनुवादी विचारसरणी पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसून आली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button