उस्मानाबाद : चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन | पुढारी

उस्मानाबाद : चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

उस्मानाबाद, पुढारी वृत्तसेवा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह उद‍्गार काढल्याप्रकरणी  येथील युवती काँग्रेसच्या वतीने जोडेमारो आंदोलन करण्यात आले.

ओबीसी आरक्षण प्रश्‍नी चंद्रकांत पाटील यांनी खा. सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह उद‍्गार काढले होते. त्यांच्या या वक्‍तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती रस्त्यावर उतरल्या. हे आदोलन प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद शहरातील जिजाऊ चौकात पार पडले. यावेळी आ. चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात निदर्शने करुन त्याच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन करण्यात आले. तर भाजपसह प्रदेशाध्यक्ष यांच्या वक्‍तव्याचा निषेध करीत आंदोलक युवतींनी जोरदार घोषणाबाजी केली.

खा. सुळे यांची माफी मागावी

यावेळी राष्ट्रवादी युवतीच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर म्हणाल्या, की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मनात महिलांबद्दल मत्सर आहे. ते वारंवार दिसून आले आहे. कोथरुडच्या भाजपच्या तत्कालिन आमदार मेधा कुलकर्णी यांची जागा बळकावून त्यांनी आमदारकी मिळविला आहे. तिथेही त्यांनी मेधाताईंचा अनादर केला. आता संसदरत्न पुरस्कार विजेत्या खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल ते अनुद‍्गार काढत आहेत. यावरुनच त्यांची मानसिकता लक्षात येते. चंद्रकांत पाटील यांनी खा. सुळे यांची माफी न मागितल्यास त्यांना महाराष्ट्रात फिरु न देण्याचा इशाराही त्‍यांनी दिला.

हेही वाचलंत का? 

Back to top button