पुढारी ऑनलाईन डेस्क
आपला चित्रपट रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी चित्रपटाचे निर्माते कलावंत वेगवेगळ्या कल्पक योजना आखतात, ठिकाणं निवडतात. आपलं प्रमोशन इतरांपेक्षा वेगळं असावं, रसिकांनी त्याची दखल घेऊन आपली कलाकृती पहाण्याची उत्सुकता दाखवावी, चार कौतुकाचे शब्द बोलावेत यासाठी हा सगळा प्रपंच सुरू असतो. (Bunny) अशीच एक चमकदार कल्पना आखून निर्माते शंकर धुरी आणि दिग्दर्शक निलेश उपाध्ये यांनी ती प्रत्यक्षात उतरविली देखील. (Bunny)
'आकृती क्रिएशन्स' निर्मित 'बनी' या चित्रपटाचा फर्स्टलूक '७५व्या 'कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान 'इंडिया पॅव्हेलियन'मध्ये करण्यात आला. या मराठी भाषेतील वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाची पहिली 'झलक' पाहिल्यावर रसिकांची उत्सुकता शिगेला पोहचली. चित्रपटाचे पोस्टर उघडताच प्रेक्षकांनी त्यासोबत सेल्फी छायाचित्रे काढत आपल्या पसंतीची पावती दिली.
निर्माते शंकर धुरी यांची 'बनी' ही पहिली कलाकृती आहे. आपला मराठी चित्रपट सीमोल्लंघन करून जगभरातील जिज्ञासू, रसिकांसमोर या पूर्वीच पोहचला आहे. चित्रपटाचा विषय आणि त्याविषयीचं कुतुहल निर्माण करण्याचं काम गेली अनेक वर्ष आपले मराठी चित्रपट चोख करीत आहेत, "जगभरातील सुजाण प्रेक्षक आपल्या चित्रपटांचे मनःपूर्वक कौतुक करतात, तेव्हा खरा आनंद होतो आणि त्याहून अधिक जेव्हा प्रेक्षक चित्रपटगृहात तिकीट काढून चित्रपट पाहतात" असे उद्गार दिग्दर्शक निलेश उपाध्ये यांनी काढले.
कान्स सोबत सुरु झालेला हा प्रवास भारतासह जगभरातील इतर मानांकित महोत्सव व पुरस्कारांमध्ये सुरु ठेवणार असल्याचे या महोत्सवाचे क्युरेटर मोहनदास यांनी सांगितले.