टाकळी ढोकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
पारनेर तालुक्याच्या उत्तर परिसरात गेल्या तीन-चार वर्षांपासून जंगलातील वन्यप्राण्यांनी लोकवस्ती नजीक ठाण मांडले आहे. मंगळवारी (दि.24) दुपारी अडीच वाजता काटाळवेढा गावातील डोंगरवाडी शिवारात दगडू कडूस्कर यांच्या 40 फूट खोल कोरड्या विहिरीत नागरिकांना बिबट्या आढळून आला. वनविभाग व नागरिकांच्या मदतीने तब्बल 12 तासांच्या कसरतीनंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. बिबट्या खोल विहिरीत पडल्याची माहिती काटाळवेढाचे सरपंच पीयूष गाजरे यांनी वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी साहेबराव भालेकर यांना दिली.
यानंतर काही वेळातच वनविभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. तोपर्यंत ही बातमी वार्यासारखी आसपासच्या गावात पसरली, त्यामुळे बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी केली. या गर्दीमुळे बिबट्याला बाहेर काढण्यात रेस्क्यूू टीमला अडचणी येत होत्या. त्यामुळे वनविभागाच्या आवाहनानंतर नागरिकांनी परिसर मोकळा करून दिला. यानंतर बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी आळेफाटा येथून क्रेन आणले, या क्रेनच्या मदतीने पिंजरा विहिरीमध्ये सोडण्यात आला.तब्बल 12 तासांनंतर म्हणजेच रात्री साडेनऊ वाजता बिबट्या विहिरीत सोडलेल्या पिंजर्यात अडकला.
यानंतर सावधगिरी बाळगत क्रेनच्या मदतीने हा पिंजरा हळूहळू वर ओढण्यात आला. वनविभाग व ग्रामस्थांच्या सहकार्याने बिबट्याला यशस्वीपणे विहिरीमधून बाहेर काढण्यात आले असून, पुढील तपासणीसाठी बिबट्याला माणिकडोह (जुन्नर) येथे नेण्यात आले. हा बिबट्या अन्नाच्या शोधात सोमवारी (दि.23) पहाटेच्या दरम्यान विहिरीत पडला असल्याचे वनविभागाचे साहेबराव भालेकर यांनी सांगीतले.
या रेस्क्यू मोहिमेसाठी टाकळी ढोकेश्वरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप, वनपरिमंडल अधिकारी साहेबराव भालेकर, वनपरिमंडल अधिकारी मारुती मोरे, वनरक्षक धर्मवीर तोरंबे, वनरक्षक विजय थोरात, वनरक्षक नाना गायकवाड, वनरक्षक गायकवाड भाऊसाहेब, वनरक्षक वाघमारे, वनमजूर अण्णासाहेब दरेकर, वनमजूर किसन जाधव, रंगनाथ भुतांबरे, वनमजुर धोत्रे, तसेच बाळू बबन गुंड, विलास भाईक, दत्ता भाईक, सबाजी गुंड, संपत भाईक, विकास गाजरे, शांताराम डोंगरे, बाळू भाईक, सोमनाथ भाईक, भास्कर भाईक आदींनी सहकार्य केले.
उसाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे बिबट्यांचा अधिवास (दडण) कमी झाल्यामुळे भक्ष्य व पाण्याच्या शोधात बिबट्यांंसह अन्य वन्यप्राण्यांचा अधिवास दक्षिणेकडे वाढला असून, लोकवस्तीचा आधाराने गेल्या चार-पाच वर्षांपासून पारनेर तालुक्यात बिबट्यांंच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यात जंगलात भक्ष्य व पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवत असल्यामुळे भक्ष्य व पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांनी लोकवस्तीचा आधार घेतला असल्याचे वनअधिकारी साहेबराव भालेकर यांनी सांगितले.