शिवसेना हिंदुत्वाचा डीएनए विसरली : भाजप आमदारांची टीका

शिवसेना हिंदुत्वाचा डीएनए विसरली : भाजप आमदारांची टीका
Published on
Updated on

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो ऐवजी संभाजी महाराजांचा फोटो असलेले काही बॅनर्स डोंबिवलीत लावण्यात आले. ही फार मोठी चूक असून शिवसेना हिंदुत्वाचा डीएनए विसरली असल्याची टिका डोंबिवलीतील भाजपाचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी केली.

या टीकेला प्रत्युत्तर देत शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी आमदार रविंद्र चव्हाण यांची तर धोबीपछाडच केली. 'आमच्या रक्तात हिंदुत्वच आहे. त्यामुळे डीएनए करण्याची गरज नाही. मात्र महाराजांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्यांनी शिवसेनेला हिंदुत्व कदापि शिकवू नये', असाही टोला त्यांनी आमदार चव्हाण यांना लगावला.

डोंबिवलीत शिवजयंतीनिमित्त शिवसेना शहर मध्यवर्ती शाखेतर्फे काही बॅनर्सवर छत्रपती शिवाजी महाराजांऐवजी छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो छापण्यात आल्याचे समोर आले. यावरून भाजपा आमदार चव्हाण यांनी सेनेवर हल्‍लाबोल केला. ते म्‍हणाले, शिवसेनेच्या सर्व उच्चपदावर असेलेल्या मंडळींचा पिंडच मुळात शिवसेनेचा नाही. अन्य पक्षातून उसनवार घेतलेली ही सर्व मंडळी आहेत. किंबहुना यांना हिंदुत्व म्हणजे नेमके काय हेच माहीत नाही. परंतु आज एखादा सच्चा शिवसैनिक शिवसेना शहरप्रमुखसारख्या महत्वाच्या पदावर असता तर ही चूक घडली नसती, असे आमदार चव्हाण म्‍हणाले.

पुढे बोलताना ते म्‍हणाले, विशेष बाब म्‍हणजे या बॅनरवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचेही नाव असून आता तरी त्यांचे डोळे उघडले आहेत की नाही, हे पाहण्याची गरज आहे. तसेच यात कदाचित खासदारांची चूक नसेलही, कारण बॅनर त्यांच्या शहरप्रमुखांनी लावले होते. परंतु अशा पदांवर आज खरा शिवसैनिक असता तर अशी चूक झाली नसती, हे मात्र नक्की असल्याचे आमदार चव्हाण म्हणाले.

तसेच, आपल्या रक्तात, श्वासात आणि नसानसांत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. शिवरायांचे हिंदवी स्वराज्य हीच आपली ओळख आहे, असे असताना आयाराम शिवसैनिक असलेल्या शहरप्रमुखांनी छत्रपती शिवाजी महाराज नव्हे तर शंभूराजेंचे चित्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणून डोंबिवलीत लावले. हिंदुत्वाचा मुखवटा घातलेले लोक घेऊन शिवसैनिक बनवले असल्याचे सांगत हिंदुत्वाचा अस्सल डीएनए यांच्या रक्तात येईल कुठून? असाही सवाल त्‍यांनी यावेळी उपस्थित केला.

आमदार चव्हाण यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिलगिरी व्यक्त केली. आणि त्‍यावेही ते म्‍हणाले, डोंबिवलीतील 1- 2 बॅनरवर नजरचुकीने छत्रपती शिवाजी महाराजांऐवजी छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो आला. त्याबद्दल आम्‍ही दिलगिरी व्यक्त करतो. मात्र आमदारांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. शहरप्रमुख पदी कुणाला बसवायचे हा आमच्या पक्षाचा प्रश्न आहे.

शिवसेनेतर्फे सोमवारी शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक न भूतो न भविष्यती अशीच होती. ही मिरवणूक पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असावी. आमच्या रक्तात हिंदुत्वच आहे. त्यामुळे डीएनए करण्याची गरज नाही. भाजपाने कधी शिवजयंती साजरी केलेली पाहिले नाही. बॅनर लावलेले दिसले नाहीत. त्यामुळे अशा पध्दतीने दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय. अशा गोष्‍टीत तरी किमान राजकारण करू नये. विकासाबद्दल न बोलता विषय भरकटवण्याचा आमदारांचा हा प्रयत्न असल्याचेही शहरप्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले.

हेही वाचा  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news