संजय राऊत : ‘भाजपचा भगवा आहे की नाही माहीत नाही पण भगव्याचा ‘दांडा’ फक्त आमचाच’ | पुढारी

संजय राऊत : 'भाजपचा भगवा आहे की नाही माहीत नाही पण भगव्याचा 'दांडा' फक्त आमचाच'

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : भविष्यात शिवसेना-भाजप एकत्र येणार नाही. एखादी भूमिका घेतली की त्यावरून शिवसेना मागे येणार नाही. ज्या पद्धतीनं २५ वर्ष एकत्र काम केलं. ते विसरुन भाजप सूडानं वागतंय. त्यामुळे एकत्र येणं शक्य नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं.

त्यामुळे आगामी काळात शिवसेना-भाजप युती होणार नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं असून युतीच्या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे. तसेच शिवसेनेची आगामी वाटचाल काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतच होणार असल्याचेही संकेत मिळत आहेत. भाजपचा भगवा आहे की नाही? माहित नाही पण भगव्याचा दांडा फक्त आमचाच आहे. भाजपचा आहे की नाही माहित नाही, असा चिमटाही राऊत यांनी काढला.

शिवसेना नेते संजय राऊत हे नागपूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत विविध प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच शिवसेना-भाजप युतीच्या चर्चांना पूर्णविरामही दिला. एमआयएमशी आघाडी होणार नाही. हे सांगणारा मी पहिला माणूस आहे.

एमआयएमने उत्तर प्रदेशात भाजपची बी टीम म्हणून काम केलं. त्यामुळे समाजवादी पार्टीचं मोठं नुकसान झालं. मतांची आकडेवारी पाहिल्यावर एमआयएम कुणासाठी काम करते हे दिसून येतं, असं राऊत म्हणाले.

किमान समान कार्यक्रमावर राज्यात सरकार बनले आहे. कुणीही आपला पक्ष इतर पक्षात विलीन केला नाही. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे, असं सांगतानाच महाविकास आघाडीने एकत्र मनपा निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा आहे. पण तसं झाले नाही. तर नागपुरात आम्ही स्वबळावर लढू, असं ते म्हणाले.

संजय राऊत : कोल्हापुर च्या जागेचा २०२४ ला विचार

कोल्हापूरची जागा अनेक वर्ष शिवसेना लढत आहे आणि जिंकत आहे. परंतू २०१९ ला शिवसेना-भाजपा युती असताना शिवसेनेचे राजेश क्षिरसागर पराभूत झाले. काँग्रेसचा उमेदवार जिंकून आला. त्यामुळे पोटनिवडणुकीत ही जागा काँग्रेसला दिली आहे. २०२४ च्या निवडणुकीत या जागेबाबत पुन्हा चर्चा होईल असं सूचक विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी नागपुरात केलं आहे.

शिवसेनेने राबवलेल्या शिवसंपर्क अभियानानिमित्त संजय राऊत राज्याचा दौरा करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक लागली आहे. ही जागा काँग्रेसला गेल्याने शिवसैनिक नाराज झाले यावर राऊत यांनी हे सुचक वक्तव्य केले आहे. नागपुरमध्ये संजय राऊत यांनी प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

कोल्हापूर उत्तर जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसैनिक नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीचा विचार करता ज्या जागा आमच्या पक्षाकडे नाही त्याठिकाणी संघटनात्मक बांधणी करून निवडणूक लढवण्याचा आमचा मानस आहे.

Back to top button