‘ते’ दुर्मीळ वन्यजीव घेणार मोकळा श्वास ; नैसर्गिक अधिवासात सोडण्यास न्यायालयाची परवानगी | पुढारी

'ते' दुर्मीळ वन्यजीव घेणार मोकळा श्वास ; नैसर्गिक अधिवासात सोडण्यास न्यायालयाची परवानगी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील वन्यजीव तस्करी प्रकरणी छापेमारीत हस्तगत करण्यात आलेले वन्यजीव लवकरच मोकळा श्वास घेणार आहेत. वनविभागाचा विनंती अर्ज ग्राह्य धरत जिल्हा सत्र न्यायालयाने संबंधित वन्यजीवांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, तत्पूर्वी संबंधित वन्यजीवांची आरोग्य तपासणी करून फिटनेस प्रमाणपत्र तयार करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

नाशिक पश्चिम वनविभागाच्या पथकाने 15 दिवसांपूर्वी शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या द्वारका परिसरातील मत्स्यालयावर छापेमारी करत दुर्मीळ वन्यजीवांची तस्करी रोखली होती. या कारवाईत शेड्यूल्ड एक ते पाचमधील वन्यजीव आढळून आल्याने वनविभागाने तपासाची चक्रे फिरवित तिघा संशयितांना ताब्यात घेतले. तसेच इतरही पेट शॉपची चौकशी सुरू करत विविध ग्राहकांकडून विक्री व पाळण्यास बंदी असलेले वन्यजीव जप्त केले.

तस्करांच्या मागावर असलेल्या वनविभागाने आतापर्यंत सुमारे 61 दुर्मीळ वन्यजीव हस्तगत केले आहेत. त्यामध्ये विदेशी पोपट, कासवांसह हड्जहॉग यांसारख्या वन्यजीवांचा समावेश आहे. हे वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली इको-इको फाउंडेशनचे स्वयंसेवक संगोपन करत आहे. सर्व वन्यजीवांना दररोज ठरावीक वेळेत कोवळ्या उन्हात ’सनबाथ’साठी आणले जाते. तसेच त्यांना आवश्यक डाएटही दिला जात आहे. खोलीतील तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी खास हिटरची व्यवस्था करण्यात
आली आहे.

दरम्यान, वनविभागाच्या पाहुणाचारानंतर वन्यजीव नैसर्गिक अधिवासात मोकळा श्वास घेण्यासाठी सज्ज होत आहेत. वन्यजीवांच्या डाएटवर आतापर्यंत सुमारे 15 हजार खर्च करण्यात आले आहे. सर्वच वन्यजीव सदृढ झाले असून, त्यांना मुक्त करण्याची तयारी सुरू आहे. आरोग्य तपासणीनंतरच सदृढ वन्यजीवांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे व मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले यांनी स्पष्ट केले.

ग्राहकांच्या घरी धाडसत्र
पेट शॉपमधून वन्यप्राणी विकत घेतलेल्या ग्राहकांची माहिती वनविभागाला प्राप्त झाली आहे. त्या आधारे संबंधित ग्राहकांच्या घरी धाडसत्र राबविण्यात येणार असून, वन्यजीव सापडल्यास संबंधितांविरोधात वन्यजीव अधिनियम – 1927 अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर वन्यजीव बाळगणार्‍या नागरिकांनी त्वरित वनविभागासोबत संपर्क साधून, वन्यजीव सुपुर्द करण्याचे आवाहन उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी केले आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

Back to top button