कर्नाटकात शैक्षणिक संस्थांत धार्मिक पोशाखावर बंदी, सरकारकडून आदेश जारी | पुढारी

कर्नाटकात शैक्षणिक संस्थांत धार्मिक पोशाखावर बंदी, सरकारकडून आदेश जारी

बंगळूर : वृत्तसेवा

कर्नाटक सरकारच्या अल्पसंख्याक कल्याण विभागाने राज्यातील शाळा, महाविद्यालये आणि अन्य शैक्षणिक संस्थांत धार्मिक पोशाखावर बंदी घातली आहे. त्यानुसार शाळेच्या आवारात हिजाब, भगवे शेले, स्कार्प आदीचा वापर करता येणार नाही. गुरुवारी मध्यरात्री याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयात यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी सुरू आहे. न्यायालयाचा निकाल येईपर्यंत धामिक पोशाखावर यापूर्वीच बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आता अल्पसंख्याक कल्याण विभागाने पुढील आदेशापर्यंत धार्मिक पोशाखावर बंदी घातली आहे.

कर्नाटकात हिजाबवरून वाद सुरूच

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा

हिजाबचा वाद दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. गुरुवारी बेळगावसह शिमोगा, दावणगिरी व इतर ठिकाणी हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आला. यावरून विद्यार्थिनी, पालक आणि कॉलेज व्यवस्थापनात वाद झाला. कोणत्याही वेळी न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन होऊ देणार नसल्याची भूमिका व्यवस्थापनांनी घेतली.

शिमोग्यातील कमला नेहरू महाविद्यालयातील विद्यार्थिनी हिजाब परिधान करून आल्या होत्या. यावेळी पोलिस आणि पालकांमध्ये बाचाबाची झाली. शेकडो विद्याथिनींनी परिसरात निदर्शने केली. हिजाब हा आपला हक्क आहे. शिक्षणाएवढेच हिजाबही महत्त्वाचे असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

बळ्ळारीतील सरलादेवी कॉलेजमध्ये हिजाबधारी विद्यार्थिनींना व्यवस्थापनाने प्रवेश नाकारला. पोलिस निरीक्षकांनी पालक, विद्यार्थिनींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. मुस्लिम युवक, विद्यार्थी, पालक, एसडीपीआय कार्यकर्त्यांनी प्राचार्य आणि सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. चित्रदुर्गमधील महिला पदवीपूर्व महाविद्यालयातही हिजाब घालून आलेल्या विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आला.

Back to top button