

सोलापूर : जगन्नाथ हुक्केरी
काशी पीठाचे विद्यमान जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी मठ, मंदिरे उभी करण्यापलीकडे समाजहिताचेही काम केले आहे. धर्म कार्याबरोबरच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. सध्या याचा फायदा समाजातील गरजूंना होत आहे. भविष्यात शिक्षणातील बाजारीकरण संपवून वैद्यकीय शिक्षणावर भर देण्यात येणार आहे. यामुळे भविष्यात काशी पिठातून डॉक्टर घडणार असल्याचे विधान काशी पिठाचे नूतन जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामी यांनी केले.
होटगी मठाची जबाबदारीही माझ्यावर असल्याने सोलापुरातही लवकरच मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा विचार आहे. त्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे, असेही ते म्हणाले. सोलापूर येथील पट्टाभिषेक, सिंहासनारोहण कार्यक्रम झाल्यानंतर ते दैनिक 'पुढारी'शी बोलत होते.
ते म्हणाले, विद्यमान जगद्गुरुंनी शिक्षणासाठी पुण्यासह इतर शहरात गरीब विद्यार्थ्यांना किफायतशीर आणि मोफत निवास आणि भोजन व्यवस्था करण्याचे मोठे काम केले आहे. याचा फायदा आज अनेकांना होत आहे. होटगी मठाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शिक्षण संस्था चालवल्या जात आहेत. त्याच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण सुरू करण्याचे नियोजन सुरू असताना काशी पिठाची जबाबदारी आली. आज श्रीशैल पीठांतर्गत असलेले होटगी मठ आणि काशी पिठाचे जगद्गुरु म्हणून समाजातील गरीब, वंचित घटकांना वैद्यकीय शिक्षण मिळावे, यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.