मनी लाँड्रिंग प्रकरण : नवाब मलिकांचे डी गँगशी संबध असल्याचे सकृतदर्शी पुरावे : विशेष न्यायालयाचे मत

मनी लाँड्रिंग प्रकरण : नवाब मलिकांचे डी गँगशी संबध असल्याचे सकृतदर्शी पुरावे : विशेष न्यायालयाचे मत
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी (डी गॅंग) संबंध असल्याचा आरोपात प्रथमदर्शनी तथ्य आहे, असे मत सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने व्यक्त केले. नबाब मलिक यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राची विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी दखल घेताना हे स्पष्ट केले.

सक्‍तवसुली संचालनालयाने ( ईडी ) दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली होती. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणार्‍या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे 'ईडी'ला तपासात आढळले. त्यानुसार 'ईडी'ने कारवाई करत मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्यानंतर ईडीने मलिक यांच्या विरोधात सुमारे ५ हजार पानाचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले. या आरोपपत्राची विशेष न्यायाधिश राहूल रोकडे यांनी दखल घेतली आहे.

नवाब मलिक यांनी डी कंपनीशी संबंधित असणार्‍यांबराेबर कट रचला

'ईडी'ने केलेल्या आरोपानुसार, नवाब मलिक यांनी डी कंपनीशी संबंधित असलेल्या हसिना पारकर, सलीम पटेल, सरदार खान यांच्यासोबत मनी लाँड्रिंगसाठीच गोवावाला कंपाऊंडच्या अफरातफरीचा कट रचला. ज्यातून या सर्वांनी मोठा आर्थिक घोटाळा करून बेहिशेबी मालमत्ता जमवली. त्यामुळे पीएमएलए कायद्यानुसार हे सर्व आरोपी या गुन्ह्याशी थेट संबंधित असल्याने शिक्षेसाठी पात्र असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

१९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शहावला खान हा औरंगाबाद जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना जेव्हा जेव्हा पॅरोलवर बाहेर यायचा तेव्हा तेव्हा नवाब मलिक, अस्लम मलिक, हसीना पारकर, सरदार खान यांच्यात बैठका होत असल्याचा आरोपही या आरोपपत्रात करण्यात आला आहे. ईडीने सादर केलेले पुरावे पाहता नबाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी (डी गॅंग) संबंध असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे मत न्यायालयाने व्यकत केले आहे.

नवाब मलिकांचा पाय आणखी खोलात

कुर्ल्यातील गोवावाला कम्पाऊंड हडप करण्यासाठी मनी लाँडरिंग प्रकरणात नवाब मलिक यांना अटक करण्‍यात आली हाेती. आता नवाब मलिक यांनी कुख्यात दाऊदच्या टोळीची थेट मदत घेतल्याचे सकृतदर्शनी पुरावे असल्याचे निरीक्षण विशेष न्यायालयाने नोंदविल्‍यामुळे नवाब मलिकांचा पाय आणखी खोलात गेला आहे

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नवाब मलिक यांच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल न्यायालयाने घेत आपली निरीक्षणे नोंदविली आहेत. मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यासह त्याचे कुटुंबीय आणि दाऊद टोळीतील सदस्यांच्या मालमत्ता, बेनामी संपत्ती, सट्टेबाजी, खंडणी वसुली, ड्रग्ज आणि हवाला रॅकेट यातील आर्थिक बाबींच्या संबंधीत मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी तपास करत आहे. कुर्ला येथील गोवावाला कंपाऊंड जमीन दाऊदची बहीण हसीना पारकर हिने बळकावली होती. नवाब मलिक यांनी हसीना पारकर हिच्याकडून कवडीमोल भावात ही जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणात ईडीने नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारीला अटक केली होती. ईडीने नवाब मलिक यांच्याशी संबंधित केलेल्या तपासाच्या आधारे विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

मालमत्ता हडप करण्याचा गुन्हेगारी कट रचला

नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीच्या आरोपपत्राची विशेष न्यायालयाने शुक्रवारी दखल घेतली. कुर्ल्यातील गोवाला कंपाऊंडची जागा हडप करण्यासाठी मलिक हे थेट आणि जाणूनबुजून मनी लाँड्रिंग व गुन्हेगारी कटात इतरांसोबत सामील असल्याचे दर्शवणारे प्रथमदर्शनी पुरावे आहेत. नवाब मलिकांचे दाऊद गँगशी थेट संबंध होते. दाऊदची दिवंगत बहीण हसीना पारकर आणि इतर दोन आरोपींसोबत नवाब मलिकांच्या वारंवार बैठका होत असत. मलिकांनी हसीना पारकर, सलीम पटेल आणि सरदार खान यांच्या संगनमताने मुनिरा प्लंबरची प्रमुख मालमत्ता हडप करण्याचा गुन्हेगारी कट रचला. गोवावाला कम्पाऊंड कशी हडप करायची, याचा कट रचला गेला होता. यासाठीची पाहणी करायला त्यांनी एक माणूसही नेमला होता, असं समोर आलं आहे. गोवावाला कम्पाऊंडमध्ये असलेली मालमत्ता १९९२ च्या पुरानंतर बंद करण्यात आली होती. त्यावर नवाब मलिकांनी आपल्या काही माणसांच्या मदतीने ताबा घेण्याचा प्रयत्न केला. इथली मालमत्ता बळकावण्यासाठी नवाब मलिकांनी दाऊदच्या गँगची थेट मदत घेतल्याने ईडीच्‍या आरोपपत्रात नमूद करण्‍यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news