उन्हाळ्यात पोहण्याचा मोह बेततोय जिवावर! | पुढारी

उन्हाळ्यात पोहण्याचा मोह बेततोय जिवावर!

चाकण : पुढारी वृत्तसेवा

उन्हाळ्यात पोहण्यासाठी गेल्यानंतर बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. सध्याही उन्हाळ्यात अनेक लहान मुले, युवक सर्रास धोकादायक पद्धतीने पोहताना दिसून येत आहेत. पोहण्यासाठी शहराप्रमाणे ग्रामीण भागात जलतरण तलावासारख्या सुविधा सर्रास नसल्याने कालवे, विहिरी आणि नदीत पोहण्याचा आनंद घेतला जात असला; तरी ते धोकादायकच असल्याचे आजवर घडलेल्या अनेक घटनांमधून स्पष्ट झाले आहे. उन्हाळी सुटी म्हणजे पोहायला शिकणे किंवा पोहायला जाणे, असे समीकरण मागील अनेक वर्षांत झालेले आहे. यासाठी विहीर, नदी, धरणे, तलावाकडे धाव घेतली जाते. पोहण्याचा आनंद लुटताना अतिशय काळजी घ्यावी लागते; अन्यथा जिवावरही बेतू शकते. तशा घटना दरवर्षी सुटीच्या कालावधीत घडतात.

यंदाच्या वर्षीही खेड तालुक्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत. यातील चासकमान धरणात गुरुवारी (दि. 19) बुडालेल्या चार विद्यार्थ्यांची अलीकडच्या काळातील सर्वांत मोठी घटना मानली जात आहे. खेड तालुक्यातील धरणे, विहिरी, दगडखाणी, अशा धोकादायक ठिकाणी सातत्याने अशा घटना घडत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. विशेषतः उन्हाळ्याच्या सुटीत अशा घटना हमखास प्रत्येक वर्षी घडतात. पाण्यात फोटोशूटचा मोह, अतिआत्मविश्वास, दंगा, मस्ती, हुल्लडबाजी, स्टंटबाजी, जिवावर बेतणारे प्रयोग, नवीन ठिकाणचा अंदाज नसणे, नदीवर अथवा धरणात पोहताना सोबत प्रशिक्षित व्यक्ती नसणे, मुलांचा हट्ट आणि पालकांचे काहीसे दुर्लक्ष, यामुळे आयुष्यभर मनाला रूखरूख लावणार्‍या अशा अप्रिय घटना घडत असल्याचे वारंवार समोर येत आहे.

खोल किंवा वेगाने वाहत्या पाण्यात पोहणे धोकादायक असतानाही कडकडीत उन्हाच्या पाश्र्वभूमीवर नद्यांमध्ये पोहणार्‍यांची संख्या सुट्यांचा काळ असल्याने वाढत आहे. नद्यांमधील खोल वा वाहणार्‍या पाण्यातही शाळकरी मुले पोहताना ग्रामीण भागात दिसतात. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की पोहताना होणारे अपघातांचे प्रमाण वाढते. हा प्रत्येक वर्षीचा अनुभव आहे. यंदा काही मंडळी थेट धरणांकडे धाव घेत असून, परीक्षा संपत आल्याने मुलांची पोहण्यासाठी धरणे व नद्यांवर गर्दी होत आहे. बुडून मृत्यूच्या सातत्याने घडणार्‍या घटनांच्या पार्श्वभूमीवर या दुर्घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सर्वांनीच याबाबत दक्षता घेण्याची गरज आहे.

हेही वाचा :

Back to top button