लोकल फ्रूट बीअर ठरतीय बोगसगिरीचा विषप्रयोग | पुढारी

लोकल फ्रूट बीअर ठरतीय बोगसगिरीचा विषप्रयोग

सोलापूर : जगन्नाथ हुक्केरी

महागाईच्या काळात सगळ्यांनाच स्वस्ताईचे वेध लागतात. यात नशिले पदार्थ स्वस्त मिळाल्यास घेणार्‍यांची चांदीच होते. सध्या सोलापुरात लोकल फ्रूट बीअर स्वस्त मिळत असल्याने नशा करणार्‍यांसाठी हा राजमार्ग ठरत आहे. यातील घातक पदार्थांमुळे नशेसाठी स्वस्त ठरणारी ही बीअर आयुष्य व जीवनासाठी विषच ठरत आहे. तरीही धुंद नशेसाठी रोज प्याले नव्हे, तर बाटल्या रिचवल्या जात आहेत.

आयुष्याची माती करणार्‍या फ्रूट बीअरची निर्मिती खास सोलापुरातच होते. यासाठी काही फिक्स पॉईंटही आहेत. विकणार्‍यांना विक्रीच्या ठिकाणापर्यंत त्याची डिलिव्हरी दिली जाते. यामुळे वाहतुकीतील अडथळे, पोलिसांचा त्रास या सगळ्या बाबींवर उत्पादकच मात करतात. यामुळे पिणार्‍यांच्या गळ्यात फ्रूट बीअरच्या गुळण्या गुळूगुळू लागतात.

बाटली फोडल्यानंतर फेसाळणारी बिअर घोटघोट रिचवल्यानंतर नशाही त्याच ताकदीने फेसाळत राहते. यात नशेबरोबरच धुंदी चढते आणि  पिणारा जागेवरच लोळतो. त्याची शुद्ध हरपते.  त्याला थेट उचलून न्यावे लागते. वारंवार याचे प्राशन केल्यानंतर स्मृती जाण्याबरोबरच मृत्यू ओढविण्याचा धोकाही डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

तरीही स्वस्त मिळणारी मस्त बीअर म्हणून ख्याती मिळविलेल्या या नशिली पेयाने तआतापर्यंत हजारो जणांचे कुटुंब उद्ध्वस्त केली आहेत. आणखी कुटुंबे उद्ध्वस्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात याची निर्मितीही करण्यात येत आहे. याच्या निर्मितीच्या ठिकाणांवर कधीच छापा पडत नाही. फक्त विक्री केंद्रावर धाडीचे नाटक करून पाच ते दहा बाटल्या जप्त केल्या जातात.

या कारवाईची जबाबदारी ही अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आहे. कारवाईचे सोपस्कर मात्र पोलिस पार पाडत आहेत.
ब्रँडेड फ्रूट बीअरचे प्याले रिचवले जातात. त्यात झीरो पर्सेंट अल्कोहोलचे प्रमाण असते. याची क्रेझ मेडिकल कॉलेजची मुले व मुलींमध्ये आहे, अशी चर्चा  आहे; मग सोलापुरातील ही ब[अर तीच नाही का, असा प्रश्नही सध्या उपस्थित आहे.

याची निर्मिती कशी होती, यात काय काय घातले जाते, कशाचे मिश्रण म्हणजे फ्रूट बीअर, हा सगळा गोरखधंदा कोणाच्या सांगण्यावरून सुरू आहे, याला पाठबळ कोणाचे आहे, असे एक ना अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. सुरुवातीला पिताना फ्रूट बिअरची मजा वाटते. पिताना चकणा म्हणून चक्क मिठाचा वापर केला जातो.

दारूबरोबर मीठ किंवा लोणचे धोक्याचे आहे. घोटघोटवर घेत मिठाचाही आस्वाद घेतला जातो. सुरुवातीला प्रचंड भूक लागते, भरपूर जेवावे, असेही वाटते. वारंवार याच्या प्राशनाने भूक मंदावते, या बीअरच्‍या अति  सेवनाने अशक्तपणा व कुपोषित होऊन मरणही ओढावू शकते. कुजकी फळे अन् रसायनांचे मिश्रण कुजलेली, सडलेली फळे एकत्र करून आधी शिजविली जातात. त्यानंतर त्याला आंबवण्यासाठी ईस्ट पावडरचा वापर केला जातो.

फेस येण्यासाठी अमोनियाचा अतिवापर हमखास केलाच जातो. खराब व कुजलेल्या गांजाचे पाणी, अल्कोहोल, हायड्रोक्लोरिक पावडरचा वापर केला जातो. याचा योग्य प्रमाणात किंवा शास्त्रीय पद्धतीने वापर केला जात नाही. अधिकाधिक नशा व्हावी याद़ृष्टीने अतिवापर केला जातो. यामुळे पिणार्‍याची स्मृती जाते. कलरसाठी कॅरेमलचा वापर केला जातो. हवा त्या प्रमाणात कलर आणला जातो. पूर्वी या सगळ्याचे मिश्रण शिजवले जायचे. आता न शिजवता यातही रसायन वापरले जाते.

असे असते अल्कोहोलचे प्रमाण

ओरिजनल ज्याला पिणारे ब्रँडेड म्हणतात या बीअरमध्‍ये 1.2 ते 8 टक्क्यांपर्यंत अल्कोहोलचे प्रमाण असते. नॉनअल्कोहोल बिअरमध्ये 0.05 टक्के अल्कोहोल असणे अपेक्षित असते. त्याची वारंवार तपासणीही केली जाते. मात्र बनावट फ्रूट बीअर केवळ नशेसाठी बनविण्यात येत असल्याने यात बेसुमार अल्कोहोलसह इतर रसायनांचा वापर केला जातो.

हेही वाचलं का?

Back to top button