हिंगोली : नोकरीच्या पहिल्या दिवशीच काळाचा घाला, अपघातात दोघे चुलत भाऊ जागीच ठार | पुढारी

हिंगोली : नोकरीच्या पहिल्या दिवशीच काळाचा घाला, अपघातात दोघे चुलत भाऊ जागीच ठार

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा

हिंगोली ते सेनगाव मार्गावर काळकोंडी पाटीजवळ उभ्या आयशर टेम्पोवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. संदीप कुंडलीक पाटोळे (वय ३२), भास्कर पांडुरंग पाटोळे (४० दोघे रा. गिलोरी) अशी मृतांची नावे असून दोघेही चुलत भाऊ असल्याचे पोलिसांनी सांगितले. (शुक्रवार) रात्री हा अपघात घडला आहे. विशेष म्हणजे हिंगोली औद्योगिक वसाहतीमध्ये पहिल्याच दिवशी काम करून ते परत गावी जात होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील गिलोरी येथील संदीप पाटोळे व त्याचा चुलत भाऊ भास्कर पाटोळे हे दोघे हिंगोलीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये कामाच्या शोधात आले होते. शुक्रवारी त्यांना कामही मिळाले अन् त्यांनी एक दिवस कामही केले. रात्रीच्या सुमारास दुचाकी वाहनावरून परत गावाकडे निघाले होते.

यावेळी हिंगोली ते सेनगाव मार्गावर नर्सी नामदेव जवळ एक नादुरुस्त टेम्पो रस्त्यावरच उभा होता. मात्र त्यांना टेम्पो दिसलाच नाही आणि त्यांची दुचाकी टेम्पोवर जाऊन आदळली. या अपघातात दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच नर्सी नामदेव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गिरी, उपनिरीक्षक अशोक कांबळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच गिलोरी येथील गावकरीही घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, गावकरी व पोलिसांनी दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले आहेत. या प्रकरणी अद्यापपर्यंत नर्सी पोलिस ठाण्यात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नसल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गिरी यांनी सांगितले.

दरम्यान, मृत संदीप पाटोळे यांच्या पश्चात आई, पत्नी व तीन मुली तर भास्कर पाटोळे यांच्या पश्च्यात आई, पत्नी दोन मुले, दोन मुली असा परिवार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

हे ही वाचा : 

Back to top button