SANGLI MSEB : स्वाभिमानीचा महावितरणवर धडक मोर्चा; पोलिस-आंदोलकांत बाचाबाची | पुढारी

SANGLI MSEB : स्वाभिमानीचा महावितरणवर धडक मोर्चा; पोलिस-आंदोलकांत बाचाबाची

सांगली; पुढारी वृत्तसेवा

वीज तोडणी थांबवा, बीलाची वसुली थांबवा या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज सांगलीत महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. पोलिसांनी कार्यालयाच्या गेटवर मोर्चा अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांनी गेट तोडून कार्यालयात प्रवेश केला. यामुळे पोलिस आणि कार्यकर्त्यात बाचाबाची झाली. यावेळी प्रती विद्युत पंप तीन हजार रुपये भरून घेण्याची तयारी वीज वितरण अधिकार्‍यांनी दर्शवली. (SANGLI MSEB)

मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले. विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मोर्चास प्रारंभ झाला. वीज तोडणी थांबलीच पाहिजे, अशा घोषणा देत मोर्चा वालचंद कॉलेजमार्गे स्फुर्ती चौकातील महावितरण कार्यालयावर पोहचला. या ठिकाणी पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांत जोरदार वादावादी झाली. पोलिसाचे कडे तोडत कार्यकर्ते आतमध्ये घुसले. सर्व कार्यकर्त्यांना खराडे यांनी शांत केले. (SANGLI MSEB)

यावेळी खराडे म्हणाले,  महावितरण कंपनी राजकीय दबावामुळे वीज तोडणी करत आहे. जिल्हा बँकेची निवडणूक होईपर्यंत वसुली आणि तोडणी बंद होती. पण निकाल जाहीर होताच कनेक्शन तोडायला सुरुवात झाली आहे. तीन एचपीचा पंप वापरणाऱ्या राज्यातील अडीच लाख शेतकर्‍यांना पाच एचपीची बिले दिली आहेत. तर पाच एचपीची मोटार वापरणार्‍या दीड लाख शेतकर्‍यांना साडेसात एचपीची बिले दिली आहेत. ही बिले अन्यायी आहेत. दिवसा वीज द्या, सर्व बिले भरतो. पण आमच्या मागणीप्रमाणे वीज देणार नसाल तर वीज बिल का भरायचे, हा आमचा सवाल आहे.

यावेळी भागवत जाधव यांनी स्वागत व मार्गदर्शन केले.  भरत चौगुले, राजेंद्र माने, संजय बेले, संजय खोलखुंबे, गुलाब यादव, विश्वनाथ  गायकवाड, प्रभाकर पाटील, मानसिंग पाटील आदींची भाषणे झाली. त्यानंतर अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर, संजय माळी या अधिकार्‍यांबरोबर चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी प्रती मोटर तीन हजार रुपये भरा, असा तोडगा निघाला. यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. (SANGLI MSEB)

आंदोलनात बाबा सांद्रे, बाळू जंगम, आनंदा जंगम, राजेंद्र पाटील, दामाजी डुबल, भुजंग पाटील, महेश जगताप,  शशिकांत माने, संदीप शिरोटे, प्रकाश देसाई, प्रताप पाटील, भैरवनाथ डवरी, रवी माने, गुंडा आवटी, सुदर्शन वाडकर, श्रीधर उदगावे, श्रीअंश लिंबिकै, अनिल वाघ, महादेव पवार, आशिष पाटील, चंद्रकांत पाटील, सिकंदर शिकलगार, दत्ता जाधव, तानाजी धनवड, अख्तर संदे, नागेश खामकर यांच्यासह शेकडो शेतकर्‍यांनी सहभाग घेतला.

हे ही वाचा :

Back to top button