वर्षातून एकदा ‘नदी उत्सव’ साजरा करा! : पंतप्रधान नरेंद्र मोदी | पुढारी

वर्षातून एकदा ‘नदी उत्सव’ साजरा करा! : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 81 व्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला व विश्व नदी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. हा दिवस साजरा करीत असताना जल प्रदूषण रोखण्यासाठी स्वतःला समर्पित करून घेतलेल्या सर्वांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. नदीजवळ राहणार्‍या देशवासीयांनी भारतात ठिकठिकाणी वर्षातून एकदा तरी नदी उत्सव साजरा करावा, असे आवाहन पंतप्रधानांनी यानिमित्ताने केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, नदी एक भौतिक वस्तू नाही, तर जिवंत एकक आहे आणि म्हणूनच नद्यांना आम्ही आई म्हणतो. ज्या नदीला एका आईच्या रूपात आपण ओळखतो, पाहतो, जगतो, त्या नदीविषयी एक आस्थेची भावना निर्माण होत असे. ही एक संस्कार प्रक्रिया होती. शास्त्रांनी नदीला थोडे देखील प्रदूषित करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. गुजरातमध्ये अनेकदा दुष्काळ पडतो. म्हणून तेथील समाजजीवनात एक नवी परंपरा विकसित झाली आहे.

जेव्हा पावसाला सुरुवात होते तेव्हा गुजरातेत जल जीलनी एकादशी साजरी केली जाते. आपण नद्यांच्या स्वच्छतेचे आणि त्यांना प्रदूषणमुक्त करण्याचे काम सर्वांच्या प्रयत्नांनी, सर्वांच्या सहकार्याने करू शकतो. ‘नमामि गंगे मिशन’ प्रगतीपथावर आहे. पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचा सध्या ई-लिलाव चालू आहे. यातून मिळालेला पैसा नमामि गंगे अभियानासाठी समर्पित केला जाईल.

महाराष्ट्रातील पुष्पक गावंडेसह चमूचे कौतुक

सियाचीन ग्लेशियरच्या 15 हजार फुटांपेक्षा देखील जास्त उंचीवर असलेल्या कुमार पोस्टवर तिरंगा फडकावणार्‍या दिव्यांग नागरिक महेश नेहरा, उत्तराखंडचे अक्षत रावत, महाराष्ट्राचे पुष्पक गावंडे, हरियाणाचे अजय कुमार, लडाखचे लोबसांग चोस्पेल, तामिळनाडूचे मेजर द्वारकेश, जम्मू-काश्मीरचे इरफान अहमद मीर आणि हिमाचल प्रदेशचे चोंजिन एन्गमो या चमूचे पंतप्रधानांनी कौतुक केले. ही कामगिरी आपल्या देशबांधवांची, प्रत्येक आव्हान पेलण्याची प्रवृत्ती दर्शवते, असे मोदी म्हणाले.

स्वच्छता अभियानातूनच महात्मा गांधींना खरी श्रद्धांजली

मोदी म्हणाले, महात्मा गांधींनी स्वच्छतेला जनआंदोलन बनवण्याचे काम केले. स्वच्छतेला स्वातंत्र्याच्या स्वप्नाशी जोडण्याचे काम केले. इतक्या दशकानंतर पुन्हा स्वच्छता आंदोलनाने देशाला नव्या भारताच्या स्वप्नाशी जोडण्याचे काम केले आहे आणि हे आमच्या सवयी बदलण्याचे देखील एक अभियान बनते आहे. स्वच्छता केवळ एक कार्यक्रम नाही, स्वच्छता ही एका पिढीतून दुसर्‍या पिढीकडे संस्कार संक्रमणाची जबाबदारी आहे आणि पिढ्यान्पिढ्या स्वच्छता अभियान चालते तेव्हाच संपूर्ण समाजजीवनाचा स्वच्छता हा स्वभाव बनतो. स्वच्छता ही पूज्य बापूंना या देशाने वाहिलेली खूप मोठी श्रद्धांजली आहे आणि ही श्रद्धांजली आम्हाला दर वेळी, सतत देत राहायची आहे.

यूपीआयद्वारे 350 कोटींपेक्षा जास्तीचे व्यवहार

जनधन खात्यांच्या विषयी देशाने अभियान सुरू केले. थेट मदत लाभार्थ्यांच्या खात्यात जात असल्याने भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी झाले. ऑगस्ट महिन्यात यूपीआयद्वारे 355 कोटी व्यवहार झाले. सरासरी सहा लाख कोटी रुपयांहून जास्त डिजिटल पेमेंट यूपीआयद्वारा होते आहे. यातून देशाच्या अर्थव्यवस्थेत स्वच्छता आणि पारदर्शिता येते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

तरुणांनी देशाचे ऋण फेडावे

तीन वर्षांपूर्वी, 25 सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त जगातली सर्वात मोठी आरोग्य विमा योजना – आयुष्मान भारत लागू केली होती. आज देशातील दोन -सव्वादोन कोटींपेक्षा अधिक गरिबांना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळाले आहेत. युवकांनी दीनदयालजींची मूल्ये आचरणात आणली, तर त्याची त्यांना आयुष्यात खूप मदत होऊ शकेल. आपण समाजाकडून सतत काही ना काही घेत असतो, अनेक गोष्टी घेत असतो. आपल्याकडे जे काही आहे, ते देशामुळेच तर आहे. म्हणूनच देशाप्रती असलेले आपले ऋण कसे फेडता येईल, याचा विचार युवकांनी करायला हवा.

गांधी जयंतीदिनी खादी खरेदीचा विक्रम करा

पंतप्रधान म्हणाले, देशात खादी आणि हँडलूमचे उत्पादन अनेक पटींनी वाढले आहे. दिल्लीच्या खादी शोरूममध्ये अनेकदा एका दिवसात 1 कोटीहून जास्त रुपयांचा व्यवहार झालाय. आता येत्या 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त शहरांमध्ये जिथे कुठे खादी, हँडलूम, हँडिक्राफ्टची विक्री होत असेल, तिथून तुमची खरेदी करा. दिवाळीचा उत्सव येत आहे. आपली सर्व खरेदी अशा ठिकाणांहून करून व्होकल फॉर लोकल अभियानाचे आत्तापर्यंतचे सगळे रेकॉर्ड आपण मोडावेत.

कोणीही लसीपासून वंचित राहू नये…

कोरोनाविरुद्धच्या लढाईत टीम इंडिया रोज नवनवे विक्रम रचत आहे. लसीकरणात देशाने अनेक असे विक्रम प्रस्थापित केले आहेत. या लढाईत प्रत्येक भारतीयाची भूमिका महत्त्वाची आहे. आपली वेळ आली की लस तर घ्यायची आहेच; पण या सुरक्षा चक्रातून कोणीही सुटणार नाही, हेही पाहिले पाहिजे. ज्यांचे लसीकरण झालेले नाही, त्यांना लसीकरण केंद्रात घेऊन जायचे आहे. लस घेतल्यानंतरही सर्व नियमांचे पालन करायचे आहे.

Back to top button