मोदी-बायडेन भेट : मैत्रीचे बंध द़ृढ करणार - पुढारी

मोदी-बायडेन भेट : मैत्रीचे बंध द़ृढ करणार

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

भारत-अमेरिका या जगातील दोन सर्वांत मोठ्या आणि महत्त्वपूर्ण लोकशाही देशांचे द्विपक्षीय संबंध हीच एक बाब जगासाठी आशेचा किरण ठरणार आहे. दोन्ही देश मिळून अनेक जागतिक समस्यांचा मुकाबला यशस्वीपणे करू शकतील, यावर मी आधीपासून ठाम आहे, असे ठोस प्रतिपादन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केले. भारताशी संबंध अभेद्य होतीलच; पण आगामी दशकात जगाला एक नवा आकार देण्यात बायडेन यांचे नेतृत्व यशस्वी ठरणार आहे, असा विश्वास भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

भारत-अमेरिका द्विपक्षीय बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. ‘व्हाईट हाऊस’मधील (अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान) अंडाकृती कार्यालयात बहुप्रतीक्षित मोदी-बायडेन बैठक पार पडली.

बायडेन म्हणाले, धार्मिक मूलतत्त्ववाद, विस्तारवाद ही सध्या जगासमोरील मोठी संकटे आहेत. भारत आणि अमेरिकेला त्याचा मुकाबला मिळून करायचा आहे. मला ही कल्पना आहे. म्हणूनच 2006 मध्ये अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष असताना मी स्वत: एक भाकीत वर्तविले होते. सन 2020 पर्यंत भारत आणि अमेरिका हे जगातील द्विपक्षीय संबंध सर्वाधिक घनिष्ठ असलेले देश असतील, असे मी तेव्हा म्हणालो होतो. माझे भाकीत खरे ठरलेले आहे.

बायडेन यांनी त्यांच्या मुंबई भेटीच्या आठवणींना उजाळाही दिला. मुंबईत माझे नातेवाईक आहेत, मुंबईतून मला माझ्याच आडनावाच्या (बायडेन) व्यक्तीची पत्रेही येत असतात.

मूळ भारतीय लोक हजर

‘व्हाईट हाऊस’च्या औपचारिकता विभागाच्या प्रमुखांनी पश्चिमेकडील दरवाजावर मोदींचे स्वागत केले. यावेळी व्हाईट हाऊसबाहेर मोठ्या संख्येने मूळ भारतीय हजर होते.

मोदी-बायडेन यांची पहिली भेट

बायडेन यांनी 20 जानेवारी रोजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. त्यानंतर पहिल्यांदाच बायडेन आणि मोदी यांच्यात समोरासमोर चर्चा झाली.

बैठकीसाठी अमेरिकेचाच पुढाकार

मोदी यांच्या अमेरिका दौर्‍याचा कार्यक्रम पहिल्यांदा जाहीर झाला, तेव्हा बायडेन यांच्याशी त्यांची द्विपक्षीय चर्चा होईल, असे नियोजित नव्हते. कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अनेक दिवस उलटलेही होते आणि स्वत: बायडेन यांनी पुढाकार घेऊन या बैठकीचा कार्यक्रम पत्रिकेत समावेश केला.

मोदी-बायडेन भेटीकडे चीन आणि पाकिस्तान पूर्ण वेळ डोळे रोखून होते. आगामी काळात अफगाणिस्तानात भारताने मोठी भूमिका पार पाडावी, अशी अमेरिकेची इच्छा आहे. अर्थात तूर्त हे शक्य होणार नाही.

Back to top button