सोलापूर : मनपाच्या 5 कोटींच्या विवरण पत्रास मान्यतेची प्रतीक्षा | पुढारी

सोलापूर : मनपाच्या 5 कोटींच्या विवरण पत्रास मान्यतेची प्रतीक्षा

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा महापालिका महिला व बालकल्याण विभागाच्या चालू आर्थिक वर्षातील 5 कोटींच्या विवरण पत्रास प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा आहे. या वर्षात विविध नावीन्यपूर्ण योजना राबविण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजनांसाठी चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात 5 कोटी रुपये निधीची तरतूद मंजूर करण्यात आली आहे. 5 कोटींच्या विवरण पत्राला आता प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा आहे. याला तातडीने मान्यता मिळाल्यास विविध योजना राबविता येणार आहेत. महापालिका प्रसूतिगृहात जन्मलेल्या बालिकेस बेबीकिट, महापालिका शाळांमधील विद्यार्थिनींना उपस्थिती भत्ता योजना यासह आवश्यक अशा कल्याणकारी विविध योजनांचा समावेश राहाणार आहे.

महापालिका महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने दरवर्षी विविध योजना राबविण्यात येतात. याचा लाभ आतापर्यंत शेकडो महिला व मुलींनी घेतला आहे. यावर्षाकरिता अर्थसंकल्पात 5 कोटींची तरतूद मंजूर करण्यात आली आहे. शहरातील सर्व शाळांतील विद्यार्थिनींसाठी मनपाच्या विभागातर्फे मोफत बससेवा घर ते शाळा ही योजना चालू आहे. पहिली ते दहावीतील विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ दिला जातो. यावर्षी दीड कोटींची तरतूद याकरिता केली आहे. सध्या 1100 विद्यार्थिनींना याचा लाभ मिळतो. मनपा शाळांमधील मुलींना यावर्षापासून शाळा उपस्थिती भत्ता शासन नियमानुसार मिळणार आहे. प्रत्येक विद्यार्थिनीला दरमहा साधारण दोनशे ते अडीचशे रुपये हा भत्ता मिळणार आहे.

याकरिता वार्षिक 30 लाख रुपये तरतूद आहे. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार आहे. त्यासाठी वीस लाख रुपये तरतूद करण्यात येत आहे. महिला गौरव पुरस्कार, विविध स्पर्धा, समुपदेशन, संगणक प्रशिक्षण, शिवण क्लास, पार्लर, फॅशन डिझायनिंग आदींचे प्रशिक्षणही देण्यात येते. यावर्षापासून बँकिंग प्रशिक्षण कोर्सही उपलब्ध करण्यात येणार आहे. या विविध योजना शहरातील विद्यार्थिनी, महिला व मुलींसाठी एक उपलब्धी ठरणार आहे.

यावर्षाच्या नावीन्यपूर्ण योजना

यावर्षी महिला व विद्यार्थिनींसाठी आवश्यक असलेल्या नावीन्यपूर्ण योजनांचा समावेश आहे. यूपीएससी व एमपीएससीच्या पूर्वपरीक्षा उत्तीर्ण मुलींसाठी अभ्यासिका व इतर आर्थिक सहकार्य योजना, बेबीकिट योजना, जननीशिशू आहार योजना, संगणक प्रशिक्षण, महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळ भेट कार्यक्रम, महापालिका प्रसूतिगृह, शासकीय कार्यालय तसेच इयत्ता सातवी ते दहावीपर्यंतच्या शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेडिंग आणि डिस्पोजल मशिन बसविणे आदी महत्त्वपूर्ण योजनांचा यामध्ये समावेश आहे.

Back to top button