माजी आमदार राजन पाटील भाजपाच्या वाटेवर | पुढारी

माजी आमदार राजन पाटील भाजपाच्या वाटेवर

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा मोहोळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला जोर आला आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यामुळे जोरदार धक्का बसणार आहे. मोहोळ भाजपचे नेते तथा युवकचे माजी जिल्हाध्यक्ष संजय क्षीरसागर हे त्यांना घेवून जात असल्याच्या चर्चा ही रंगल्या आहेत. या वृत्ताला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांनी दुजोरा दिला आहे. याबाबत साठे म्हणाले, मोहोळ तालुक्याच्या राजकारणात राजन पाटील यांचा सातत्याने वरचष्मा राहिलेला आहे. ते ठरवतील तोच मोहोळमध्ये आमदार होत आल्याचे दिसून येते.

आमचे सलोख्याचे संबंध आहेत. एकमेकांच्या समन्वयाने तालुक्याच्या राजकारणात अनेक ठिकाणी यश मिळाले. पण पक्षाने राजन पाटील यांच्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष उमेश पाटील आणि त्यांच्यात टोकाचे मतभेद आहेत. वास्तविक त्यांच्यातील वाद मिटविण्याचा कोणी वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केला नाही. या गोष्टी अनेक वेळा पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून दिल्या. त्याचा काही फायदा झाला नाही, असा नाराजीचा सूर साठे यांनी आळवला. या सर्वाला वैतागूनच ते आता तेच भाजपात जाणार असल्याचे समजते. ते भाजपमध्ये गेल्याने तालुक्यातील राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाटील यांचा प्रवेश कधी होईल, हे माहीत नाही.

फडणवीसांच्या फोनमुळे तातडीने हालली सुत्रे

मोहोळचे भाजप नेते संजय क्षीरसागर यांना दोन दिवसापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता. त्यानंतर मोहोळ तालुक्यात वेगाने सुत्रे हालली आहेत.तसेच क्षीरसागर यांचा फोन काल दिवसभर बंद आहे.

मी कोठे ही जाणार नाही ः काका साठे

अनेक नेते मंडळी भाजपाच्या वाटेवर आहेत.त्यामुळे भविष्यात पक्षा समोरील आडचणी वाढल्या आहेत. मात्र आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही शेवट पर्यंत पवार साहेबांशी एकनिष्ठ राहुनच काम करिन असा विश्‍वास ही बळीराम काका साठे यांनी व्यक्त केला आहे.

Back to top button