पंढरपूरमध्ये १५० किलो भेसळयुक्त पेढा जप्त; अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई  | पुढारी

पंढरपूरमध्ये १५० किलो भेसळयुक्त पेढा जप्त; अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई 

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर येथे स्टार्च भेसळ केलेले १५० किलो पेढे मंगळवारी जप्त करण्यात आले. अन्न सुरक्षा स्वयंसेवक व अन्न, औषध प्रशासन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एका व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, पंढरपूर तालुक्यात आषाढी वारीनिमित्त भेसळयुक्त पेढ्याची विक्री केली जात असल्याची माहीती सोलापूरचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर व उमेश भुसे यांना मिळाली. यानुसार पश्चिम द्वार, पंढरपूर येथील पिरगौडा शिवपत्र कोट्टली यांचे अस्थायी पेढीची तपासणी केली. पेढीत विक्रीस ठेवण्यात आलेल्या पेढ्याचा संशय आल्याने पेढ्यात आयोडीन टाकून पाहिले असता पेढ्यात स्टार्च या अन्न पदार्थाची भेसळ असल्याचे आढळून आले. पेढ्याचे ३ अनौपचारिक अन्न नमुने घेऊन सुमारे १५० किलो किंमतीचा सुमारे ६०००० रूपयांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस स्टेशनमध्ये कलम 272 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रदिपकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर व यु.एस.भुसे यांनी सिंहगड कॉलेजच्या अन्न सुरक्षा स्वयंसेवकांसह केली.

हेही वाचलंत का ?

Back to top button