वकील मुलासह डॉक्टरचा अटकपूर्व जामीन फेटाळला; बनावट मृत्यूपत्राधारे बळकाविली मालमत्ता | पुढारी

वकील मुलासह डॉक्टरचा अटकपूर्व जामीन फेटाळला; बनावट मृत्यूपत्राधारे बळकाविली मालमत्ता

पुणे : पुढारी वृत्तसेवा: बनावट कागदपत्रे व सह्यांच्या आधारे वडिलांचे मृत्यूपत्र तयार करून त्याआधारे स्थावर व जंगम मालमत्ता बळकाविणार्‍या वकील मुलासह सहा जणांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांच्या न्यायालयाने फेटाळला.
यात तीन वकील, डॉक्टर व दोन साक्षीदारांचा समावेश आहे. अ‍ॅड. परीक्षित बडे (रा. 19, देवीप्रेम, गिरिजा शंकर गृहरचना संस्था, धनकवडी), अमित कदम (रा. पर्वती दर्शन), देविदास तिकोणे (रा. लक्ष्मीनगर, पर्वती), डॉ. परितोष गंगवाल (रा. सदाशिव पेठ), अ‍ॅड. दिलीप पारेख (रा. शुक्रवार पेठ) व नोटरी असलेले अ‍ॅड. विजय अवताडे (रा. घोरपडी पेठ) अशी जामीन फेटाळलेल्यांची नावे आहेत. याबाबत, सत्यजीत बडे (वय 48, रा. कोंढवा) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हा प्रकार 18 डिसेंबर 2018 रोजी शुक्रवार पेठ येथील मामलेदार कचेरीसमोर घडला. फिर्यादी सत्यजीत बडे हे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांचा लहान भाऊ परीक्षित बडे याने अन्य साथीदारांशी संगनमत करून त्यांचे वडील देविदास बडे यांचे बनावट मृत्युपत्र तयार केले. त्यावर, देविदास यांच्या खोट्या सह्या करून सत्यजीत व त्यांच्या बहिणीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी बचाव पक्षाच्या वतीने न्यायालयात अर्ज करण्यात आला. त्यास सरकारी वकील राजेश कावेडिया व फिर्यादीतर्फे राहुल नागरे यांनी विरोध केला.

परिक्षित यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने बनावट मृत्युपत्र तयार करून त्याआधारे धनकवडी येथील बंगला, पाथर्डी येथील मिळकत, बँकेच्या लॉकरमधील मौल्यवान वस्तू व बचत खात्यातील रक्कम, तसेच पीपीएफ खात्यातील रक्कम बळकाविली आहे. मृत्यूपत्रावरील सह्या व देविदास बडे यांच्या मुळ सह्या यांमध्ये तफावत असल्याचा अहवाल असून, त्यादृष्टीने तपास करायचा आहे. मेडिकल फिटनेस वेळी देविदास यांच्या कोणत्या वैद्यकीय तपासण्या केल्या याच्या तपासासाठी आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याची विनंती अ‍ॅड. कावेडिया यांनी न्यायालयाला केली होती.

 

 

Back to top button