पंढरीसी जारे आल्यांनो संसारा | पुढारी

पंढरीसी जारे आल्यांनो संसारा

सासवड येथे संत सोपानकाकांच्या समाधी मंदिराजवळच लक्ष्मीनारायणाचे जुने मंदिर आहे. वैकुंठवासी ह.भ. प. विठोबा बाळाजी भोसले यांनी या लक्ष्मीनारायण मंदिरातून लक्ष्मीनारायण चांगदेव पालखी पंढरपूरला न्यायला सुरुवात केली. आता हा पालखी सोहळा चांगावटेश्‍वर पालखी सोहळा या नावाने निघू लागला आहे. पालखी प्रस्थान ज्येष्ठ वद्य द्वादशीला होते. ज्येष्ठ वद्य एकादशीला संत ज्ञानेश्‍वर माऊलींचा पालखी सोहळा सासवडमध्ये मुक्‍कामी येतो. पुणे ते सासवड हे अंतर तीस-बत्तीस किलोमीटर आहे. वाटेमध्ये घाट चढावा लागतो. शिवाय एकादशीचा उपवास असतो. यामुळे वारकर्‍यांना आराम मिळावा म्हणून माऊलींची पालखी दोन दिवस सासवडमध्ये मुक्‍कामी असते.

माऊलींची पालखी सासवड मुक्‍कामी असतानाच या पालखीचे प्रस्थान होते. दुपारी मंडपामध्ये भजनाला सुरुवात होते. भजन झाले की, पादुका पालखीत ठेवतात. दुपारी दोनच्या सुमारास पालखी मार्गस्थ होते. पारगाव मेमाणे, वाघापूर शिंदवणे घाट, बोरीऐंदी, सोलापूर रोडवरून खडकी, रावणगाव, पारवडी, शेटफळगडे, भिगवण, इंदापूर, अकलूज असा पालखी मार्ग आहे. सध्या चांगावटेश्‍वर पालखी सोहळ्यामध्ये 24 दिंड्या सहभागी आहेत. सोहळ्यामध्ये नगार्‍याची गाडी, देवाचा अश्‍व, रथ, पालखी असा लवाजमा असतो. रथ व पालखी लाकडी असून सोहळ्यातील भाविकांनी वर्गणी काढून ती बनवली आहे.

रथाला सासवड येथील संत सोपानकाका सहकारी बँकेतर्फे रोज फुलांची आरास करण्यात येते. वाटचालीमध्ये उभे रिंगण, गोल रिंगण व खडकीजवळ बकरीचे रिंगण होते. आषाढ वद्य दशमीला पालखी वाखरीवरून पंढरपूर येथे पोहोचते. पंढरपूरमधे पालखी मुक्‍काम विप्र दत्त घाटावरील श्री चांगावटेश्‍वर मठ येथे असतो. एकादशीला चंद्रभागा स्नान व नगरप्रदक्षिणा होते. पौर्णिमेला पालखी गोपाळपूरला काल्यासाठी जाते. काला झाल्यावर पालखीचा परतीचा प्रवास सुरू होतो. भंडी शेगाव, दसूरपाटी, पिठेवाडी, निरवांगी, कळंब, काटेवाडी, बारामती, ढोले वस्ती, जेजुरी, खळद, घोडके मळा असा परतीचा मार्ग आहे. आषाढ वद्यषष्ठीला पालखी सासवड येथील मंदिरात परत पोहोचते व सोहळ्याची सांगता होते.

Back to top button