माढा नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीसाठी 3 कोटी रुपये मंजूर | पुढारी

माढा नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीसाठी 3 कोटी रुपये मंजूर

माढा : पुढारी वृत्तसेवा

माढा शहरातील नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पामध्ये मंजूर केलेला तीन कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्याकडे वितरित केला आहे, अशी माहिती आ. बबनराव शिंदे यांनी दिली.
आ. शिंदे म्हणाले, माढा तहसील कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व माढा नगरपंचायतीस प्रशासकीय इमारत बांधकामासाठी निधी मिळण्यासाठी शासनाकडे मागणी केली होती. त्यासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीस यापूर्वी 15 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. माढा शहरात नगरपंचायत इमारत बांधण्यासाठी तीन कोटी निधी वितरित करण्यात आला असून, लवकरच त्याची टेंडर प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.

माढा हे तालुक्याचे ठिकाण आहे. शहराची वाढती लोकसंख्या व शहरात नगरपंचायतीस सुसज्ज अशी सर्वसोयींनीयुक्त इमारत व्हावी या उद्देशाने नगरपंचायतीच्या इमारत बांधकामासाठी निधी मिळण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केलेली होती. त्यानुसार राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करुन नगरपरिषदांना देण्यात येणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान अंतर्गत तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

तीन कोटी निधी मंजूर झाल्याने इमारतीचे बांधकाम चांगल्या पद्धतीने करण्यात येणार आहे. हे काम लवकरच करण्यात येणार आहे. हा निधी महाराष्ट्र शासन निर्णय मंत्रालय मुंबई येथील नगरविकास विभागाचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे नुकताच वर्ग करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.

माढा मतदारसंघातील माढा व महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतींना राज्य शासनाच्या विविध योजनेंतर्गत तसेच जिल्हा वार्षिक योजना यांच्या निधीच्या माध्यमातून अंतर्गत रस्ते, गटारी, दलित वस्ती सुधारणासह मूलभूत सुविधांसाठी जास्तीत जास्त निधी देणार आहे.

– बबनराव शिंदे, आमदार

 

हेही वाचलं का?

Back to top button