Pune Police : गुजरातहून पुण्यात येणारा ११ लाखांचा गुटखा पोलिसांनी पकडला | पुढारी

Pune Police : गुजरातहून पुण्यात येणारा ११ लाखांचा गुटखा पोलिसांनी पकडला

आळेफाटा ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा अवैधरित्या गुजरातमधून आयात केला जात आहे. दरम्यान, पुणे -नाशिक महामार्गावर सुसाट धावणाऱ्या गुटख्याने भरलेल्या मोटारीला आळेफाटा पोलिसांनी धाडसाने पकडले. या कारवाईत तब्बल ११ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी (दि. २३ जानेवारी) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. (Pune Police)

या कारवाईत एक कारसह शैलेश शशिकांत बनकर (वय ३६ रा. रानमळा, कडूस ता. खेड) आणि सचिन सखाराम सांडभोर (वय ३०, रा. दोंदे ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस कर्मचारी पद्मसिंह अप्पाराव शिंदे पोलीस वाहनातून रविवारी पहाटे पुणे नाशिक महामार्गावर गस्त घालत होते. आळेखिंड येथून आळेफाट्याच्या दिशेने येत असताना पोलीस गाडी पाहून मोटार ( एम.एच १२ टीएस १९४३) चालकाने सुसाट पळविली. पुढे पाठलाग केला असता गुंगारा देण्याचा प्रयत्न केला.

Pune Police : आम्ही घाईत असून आम्हाला जाऊ द्या

पाेलिसांनी मोटारीला काही अंतरावर धाडसाने अडवले. अधिकची चौकशी केली असता गाडीमधील चालकाने आम्ही घाईत असून आम्हाला जाऊ द्या अशी विनंती केली. पोलिसांनी मोटारीची तपासणी केली असता त्यामध्ये खोके, मिक्स मोठे पोते आढळून आले. मोटार आळेफाटा पोलीस ठाण्यात आणून अधिकची चौकशी केली. पोलिसांनी हा गुटखा तसेच वाहतुकीसाठी वापरलेली कार असा ऐकून ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर करत आहे.

हेही वाचलं का? 

दरम्यान महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा अवैधरित्या गुजरातमधून आयात करून पुणे जिल्ह्यातील दुकानदारांना पुरवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ताब्यात घेतलेला आरोपींकडून अधिक चौकशीत याचा उलगडा होणार असल्याने जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यातील गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

Back to top button