सातारा : फड सांभाळ तुर्‍याला गं आला…

सातारा : फड सांभाळ तुर्‍याला गं आला…
Published on
Updated on

वरकुटे-मलवडी : पुढारी वृत्तसेवा: दुष्काळी माण तालुक्यात उसाची शेती बहरू लागली आहे. मात्र, शेतकर्‍यांनी जीवापाड जपलेला हा ऊस तोडी अभावी शेतातच पडून राहिला आहे. तालुक्यातील शेकडो एकर आडसाली उसाला तुरे आल्याने वेळेत तोडणी न झाल्यास या उसाची चिपाडे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे 'फड सांभाळ तुर्‍याला गं आला, तुझ्या उसाला लागलं कोल्हा', अशीच अवस्था शेतकर्‍यांची झाली आहे.

माण तालुक्यातील वरकुटे- मलवडी परिसरात ऊस तोडणी अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. या परिसरात चार ते पाच कारखान्यांच्या मिळून मोजक्याच टोळ्या आहेत. सुमारे 10 हजार एकराच्यावर ऊस क्षेत्र आहे. तोडणी यंत्रणा कमी प्रमाणात असल्यामुळे शेतकर्‍यांपुढे संकट उभे राहिले आहे. ऊस वेळेत न तुटल्यामुळे ऊस उत्पादनात घट होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे.

अगोदरच अतिरिक्‍त ऊस, दराची कोंडी, भारनियमन, खतांच्या वाढत्या किमती, लोकरी मावा, हुमणी, अवकाळी पाऊस अशा विविध कारणांमुळे त्रस्त झालेल्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या संकटात आणखी भर पडली आहे. घाम गाळून जोपासलेल्या शेकडो एकर आडसाली उसावर आज तुरे डोलताना दिसत आहेत.

उसाला आलेल्या तुर्‍यांमुळे उत्पादनात, वजनात मोठी घट होणार असून साखर उतार्‍यासह वाढीवरही परिणाम होणार आहे. गळीत हंगामास झालेला विलंब, ऊसतोड मजुरांचा तुटवडा, बदलते वातावरण याचा विपरीत परिणाम ऊस पिकावर प्रकर्षाने दिसू लागला आहे. ऊस शेतात नजर जाईल तिथंपर्यंत उसाला फक्‍त तुरेच तुरे दिसत आहेत. तुरा आला की उसाची वाढ थांबते.

उसाला फुटवे फुटणे, दशी पडणे अशा प्रकारांमुळे वेळेत तोडणी न झाल्यास ऊस पोकळही होणार आहेत. ऊस दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ राहिला तर आतून पोकळ बनतो. त्यामुळे उसाच्या उत्पादनात 20 ते 25 टक्के घट होणार आहे. ऊस शेती तज्ज्ञांच्या मते, उसाच्या सर्व जातींमध्ये तुरा येण्याची क्षमता असते. वरकुटे-मलवडी व परिसरात उसाला तुरे तर आले आहेतच आणि काही ठिकाणचा ऊस वाळू लागला आहे. वेळेत ऊस तोडणी होत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.

ऊसाचे वय झाले…

अनेक ठिकाणी उसाचे तुरे आले आहेत. याला काही ठिकाणी म्हातार्‍या आल्या असे देखील म्हटले जाते. उसाचे वय झाल्यामुळे तुरे आल्याचे म्हटले जाते. उसाला तुरे आल्यामुळे ऊस आतून पोकळ होतो. त्यामुळे वजनात घट होते, याचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news