जयप्रभा स्टुडिओप्रश्नी चर्चेचे गुर्‍हाळ नको | पुढारी

जयप्रभा स्टुडिओप्रश्नी चर्चेचे गुर्‍हाळ नको

कोल्हापूर : सचिन टिपकुर्ले

जयप्रभा स्टुडिओप्रश्नी चर्चेचे गुर्‍हाळ करण्यापेक्षा हा प्रश्न तत्काळ सोडवण्याची गरज आहे. कारण, रविवारी आंदोलनाचा नववा दिवस होता. महापालिका आयुक्त व जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊनही प्रशासकीय पातळीवर अजूनही प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे आंदोलकांचा संयम सुटत चालला असून आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.

कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओचा विषय सध्या राज्यभर चर्चेत आहे. स्टुडिओच्या जागेची विक्री झाल्यानंतर कोल्हापुरातील कलाप्रेमींनी रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे. लता मंगेशकर यांच्याकडे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने स्टुडिओची जागा मागितली होती; पण त्यांनी महामंडळाच्या पदाधिकार्‍यांची दखलही घेतली नाही.

शालिनी स्टुडिओ व जयप्रभा स्टुडिओसाठी यापूर्वीही आंदोलन झाले; पण दुर्दैवाने शालिनी स्टुडिओची वास्तू नेस्तनाबूत झाली. आता आहे त्या जागेवरही रेखांकन करण्यात आले. त्यामुळे या जागेसाठीच्या आंदोलनाला किती यश मिळणार, या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीतच आहे.
शालिनी स्टुडिओसारखी अवस्था जयप्रभा स्टुडिओची होऊ नये. ही वास्तू हेरिटेजमध्ये असली, तरी ती वाचवण्याची धडपड प्रत्येक कलाप्रेमीची आहे. म्हणूनच आता आरपारच्या लर्ढाइसाठी कोल्हापूरकर सज्ज झाले आहेत.

आंदोलनात ज्येष्ठ कलाकार, तंत्रज्ञ सक्रिय

जयप्रभा स्टुडिओ जागेचा प्रश्न हा आपल्या घरचा प्रश्न आहे, असे समजून प्रत्येकजण आंदोलनात उतरत आहे. त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती वाढली आहे. प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू झाली. रोज सुरू असलेल्या साखळी उपोषणात आजच्या तरुण पिढीच्या कलाकार, तंत्रज्ञांबरोबर ज्येष्ठ कार्यकर्तेही उतरले आहेत. कोरोना काळात कलाकार, तंत्रज्ञांना काम नव्हते. आता कुठे मालिका व चित्रपटांचे चित्रीकरण सुरू झाले असून त्यातून काम मिळत आहे. ते सोडूनअनेक कलाकार, तंत्रज्ञ या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे या प्रश्नावर आता योग्य तोडगा निघण्याची गरज आहे.

राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती हवी

जयप्रभा स्टुडिओप्रश्नी पालकमंत्री सतेज पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. कोणत्याही स्थितीत स्टुडिओची जागा चित्रीकरणासाठी राखीव असावी, यावर ते ठाम आहेत. यातून प्रश्न सुटणार नाही. सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर कोल्हापूरचे आहेत. सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख व सर्वात महत्त्वाचे म्हणजे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मनावर घेतल्यास हा प्रश्न तत्काळ सुटण्यास मदत होणार आहे. केवळ चर्चेचे गुर्‍हाळ सुरू ठेवले, तर यातून काही साध्य होणार नाही. हा प्रश्न सुटण्यासाठी राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती महत्त्वाची आहे.

अश्वशक्ती मंडळाचा आंदोलनाला पाठिंबा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीसह कोल्हापूर जिल्हा अश्वशक्ती मंडळाचा सदस्यांनी घोड्यासह आंदोलनात सहभाग घेत जयप्रभा स्टुडिओप्रश्नी सुरू असलेल्या चित्रपट महामंडळाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. दरम्यान, विविध तालीम संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून कोल्हापूरसह पुणे, मुंर्बइतील रंगकर्मींचाही पाठिंबा वाढत आहे.

जयप्रभा स्टुडिओ जागेसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा रविवारी नववा दिवस होता. या आंदोलनात कोल्हापूरचे कलाकार, तंत्रज्ञ सहभागी होत आहेत. सकाळी कोल्हापूर जिल्हा अश्वशक्ती मंडळाच्या सदस्यांनी छत्रपती शिवराय, मावळ्यांच्या पोषाखातील कार्यकर्ते ढोल-ताशांचा गजरात आंदोलनस्थळी सहभागी झाले. चित्रपटांमध्ये घोड्यांचा वापर केला जात आहे. पूर्वी जयप्रभा स्टुडिओत घोड्यांचा सहभाग असणारे अनेक सीन होते. त्यामुळे जयप्रभा स्टुडिओशी अप्रत्यक्ष कोल्हापूर जिल्हा अश्वशक्ती असोसिएशनचा सहभाग आहे. जयप्रभा स्टुडिओ जागेवर चित्रीकरणच झाले पाहिजे यासाठी महामंडळाच्या खांद्याला खांदा लावून या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, माजी नगरसेवक संघटनेनेही या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. माजी नगरसेवक भूपाल शेटे, अनिल कदम, अशोक भंडारे यांनी मनोगत व्यक्त केले. शेटे यांनी विकसकाला टीडीआर दिल्यास जयप्रभाचे अस्तित्व कायम राहणार आहे. ही वास्तू हेरिटेजमध्ये असल्याने याचा चित्रीकरणासाठी चांगल्या पद्धतीने वापर करता येईल, असे सांगितले. अशोक भंडारे यांनी महामंडळाच्या आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याचे आश्वासन दिले. यावेळी दत्ताजी काशीद चौक मंडळ, कृष्णा कला व क्रीडा व सांस्कृतिक व सामाजिक संस्था यांनी पाठिंबा जाहीर केला.पाठिंब्याचे पत्र धनाजी यमकर यांना दिले. यावेळी महामंडळाचे विजय शिंदे, इम्तीयाज बारगीर, बाळा जाधव, रवींद्र मोरे व कलाकार, तंत्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button