सातारा जिल्हा बँक निवडणूक : सत्यजितसिंह पाटणकर यांचा राज्यभर बोलबाला | पुढारी

सातारा जिल्हा बँक निवडणूक : सत्यजितसिंह पाटणकर यांचा राज्यभर बोलबाला

पाटणः गणेशचंद्र पिसाळ

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू व विद्यमान गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा जिल्हा बँकेत पराभव करणारे राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांचा आता जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर बोलबाला झाला आहे. राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे ते सुपुत्र आहेत.

सत्यजितसिंह पाटणकर हे सन २००७ मध्ये झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत ते पहिल्यांदा निवडून आले. सभापतीपद भूषवले. या काळात त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये  नावलौकिक प्राप्त केला . त्यानंतर तालुक्यातील बहुतांश शैक्षणिक , सामाजिक, राजकीय व सहकारी संस्थांवर त्यांनी निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले . सन २०१४ व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा शंभूराज देसाई यांच्याकडून पराभव झाला.

कोणत्याही विजयाने हुरळून व पराभवाने खचून न जाता सत्यजितसिंहांनी सातत्याने आपली वाटचाल कायम ठेवली . या जिल्हा बँकेची स्थानिक समिकरणे गेल्या अनेक वर्षापासून विक्रमसिंह पाटणकर यांच्याच हातात होती . अनेक वर्षे ते स्वतः अथवा त्यांनी आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनांही जिल्हा बँकेत संधी दिली होती . शंभूराज देसाई यांनी गेल्या दोन वर्षात राज्य मंत्रिपदाच्या माध्यमातून मिळवलेला नावलौकिक, व प्रचंड बोलबाला होता.

जिल्हा बँकेत सत्ताधारी पॅनेलमधून त्यांना यावेळी उमेदवारी देण्यासाठी  दस्तूरखुद्द राष्ट्रवादीचे वरिष्ठ व जिल्ह्यातील काही नेतेमंडळी आग्रही होती.  पाटणकरांच्या कडाडून विरोधनंतर सत्ताधार्‍यांना नमते घ्यावे लागले. शंभूराज देसाई यांना बाजूला ठेवत येथून पहिल्यांदाच सत्यजितसिंहांना उमेदवारी देण्यात आली . यातूनच येथे महाविकास आघाडीचा घटस्फोट झाला आणि गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक पारंपारिक देसाई पाटणकर गटातच ही निवडणूक झाली.

जिल्हा बँकेच्या या निवडणुकीला विधानसभेचे रूप प्राप्त झाले . यात वाटेल ते झाले तरी प्रचंड आत्मविश्वासाने ना. देसाईंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सत्यजितसिंह पिताश्री विक्रमसिंह पाटणकर यांचे मार्गदर्शन व निष्ठावंतांच्या सहकार्यातून या निवडणुकीला तेवढ्याच तडफेने सामोरे गेले. एकूण १०२ मतांपैकी सत्यजीतसिंहांना ५८ तर ना देसाई यांना अवघी ४४ मते मिळाली. पाटणकरांचा १४ मतांनी विजय झाला. जिल्ह्यातील सोसायटी मतदारसंघांच्या विजयी उमेदवारांच्या तुलनेत पाटणकरांचे हे यश मोठे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जिल्ह्यातील सहकारी व राजकीय क्षेत्रातील सत्यजितसिंहांची ही दमदार एंट्री मानली जात आहे.

हेही वाचलं का?

 

Back to top button