सातारा जिल्हा बॅंक : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचा पराभव | पुढारी

सातारा जिल्हा बॅंक : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचा पराभव

पाटण ; पुढारी वृत्तसेवा

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा जिल्हा बॅंकेच्या पाटण तालुका सोसायटी मतदारसंघात राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी त्यांच्यावर 14 मतांनी विजय मिळवला आहे.

या निवडणुकीत १०२ मतदानांपैकी सत्यजितसिंहांना ५८ व ना. देसाई यांना ४४ मते पडली. यात सत्यजितसिंह हे चौदा मतांनी विजयी झाले. सत्यजितसिंह पाटणकर यांच्या विजयानंतर पाटण विधानसभा मतदारसंघात सर्वत्र जल्लोष सुरू झाला आहे. गावागावात फटाक्‍यांची आतषबाजी, गुलालाची उधळण व बॅनरबाजी करून कार्यकर्ते पदाधिकारी, हितचिंतक आपला आनंद व्यक्त करत आहेत.

आमदार शशिकांत शिंदे यांचा केवळ एक मतांनी पराभव

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत एका धक्कादायक निकालाची नोंद झाली. जावली प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला. यात आमदार शशिकांत शिंदे केवळ एक मतांनी पराभूत झाले. शशिकांत शिंदे यांना २४ मते मिळाली. तर ज्ञानदेव रांजणे २५ मते घेऊन विजयी झाले आहेत.

सातारा जिल्हा बँक निवडणुकीतील कराड तालुका सोसायटी गटात राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रतिष्ठेच्या लढाईत आठ मतांनी विजय मिळवला. त्यांनी संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या लढतीत राज्याचे माजी सहकार मंत्री स्व. विलासराव पाटील – उंडाळकर यांचे सुपूत्र जिल्हा परिषद सदस्य ॲड. उदयसिंह पाटील यांचा पराभव केला. मागील सहा दशकांपासून एकतर्फी वर्चस्व असणाऱ्या कराड तालुका सोसायटी गटात स्व. विलासराव पाटील – उंडाळकर यांच्या निधनानंतर पहिल्याच निवडणुकीत उंडाळकर गटाचे वर्चस्व संपुष्टात आले असून आता नवीन अध्यायास प्रारंभ झालाय.

Back to top button