सातारा : चक्रम राजकारणाचे इकड्म तिकड्म | पुढारी

सातारा : चक्रम राजकारणाचे इकड्म तिकड्म

सातारा : हरीष पाटणे

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मतदानादिवशी न भूतो न भविष्यती अशा तडजोडी, मोडतोडी घडल्या. सातारा जिल्ह्याच्या जनतेचा राजकारणावर विश्‍वास बसणार नाही इतके चक्रम राजकारणाचे इकड्म तिकड्म जिल्ह्यात घडून गेले. सामान्य माणसाचीच मती नव्हे तर ‘बारामती’चीही ‘मती’ गुंग होईल, अशा करामती बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकट्या सातारा जिल्ह्यात मतदानादिवशीच घडून गेल्या आहेत.

ज्यांनी गेल्या 15 वर्षात टोकाचा संघर्ष केला ते विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर व भाजपचे आ. जयकुमार गोरे हे आश्‍चर्यजनकरित्या एकत्र आले. आ. जयकुमार गोरे, खा. रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी संपूर्ण निवडणुकीतून आपले अख्खे पॅनल माघारी घेतले.

मतदानाच्या दिवशी तर राष्ट्रवादीचे माणसोसायटीचे उमेदवार मनोज पोळ यांना आ. जयकुमार गोरे यांच्या गटाने पाठिंबा दिला म्हणे! महाविकास आघाडीच्या सूत्रालाही सगळीकडे फाट्यावर मारले गेले. दुसरीकडे खटावमध्ये आ. जयकुमार गोरे यांनी डॉ. दिलीप येळगावकर, रणजितसिंह देशमुख ज्यांची खिंड लढवत आहेत त्या प्रभाकर घार्गें नाही पाठिंबा दिला. गोरे यांच्या या दोन्ही ‘मूव्ह’ कल्पनेपलिकडच्या आहेत.

खटावमध्येच ज्यांनी कायम संघर्ष केला ते डॉ. दिलीप येळगावकर, रणजितसिंह देशमुख हे मतदानादिवशीही प्रभाकर घार्गे यांच्यासाठीही मैदानावर टिच्चून उभे राहिलेले दिसले आणि ज्या घार्गेंनी पक्षासाठी योगदान दिले व अनेकांना पदे मिळवून दिली तेच घार्गें विरोधात दिसले.

कराड उत्तरेत एकेकाळी बाळासाहेब पाटील व अतुल भोसले यांचा कडाक्याचा संघर्ष झाला. तेच डॉ. अतुल भोसले भाजपचे असूनही सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्यासोबत जाताना दिसले. भाजपचे आ. शिवेंद्रराजे भोसले तर संपूर्ण निवडणुकीत राष्ट्रवादी प्रणित पॅनलबरोबर राहिले. मतदानादिवशीही राष्ट्रवादी प्रणित पॅनलच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ते प्रयत्नात दिसले.

ज्ञानदेव रांजणेंना भाई वांगडे यांच्याकडे शशिकांत शिंदे हेच पाहिल्यांदा घेवून गेले असे शिंदे सांगत आहेत. ते खरे मानले तर रांजणे यांनीही शिंदेंना टांग मारली असेच म्हणावे लागेल. एवढेच काय आ. शशिकांत शिंदे व वसंतराव मानकुमरे यांनी बसून मानकुमरे यांच्या पत्नीचा ठराव केला होता म्हणे मात्र एका टेंडरमधून झालेल्या वादावादीवरून मानकुमरे नाराज झाले आणि त्यातून जावलीत रामायण घडले.

रामराजे व उदयनराजेंचा पराकोटीचा संघर्ष, उदयनराजे व शिवेंद्रराजेंचे कडाक्याचे भांडण. निवडणुक लागल्यानंतर उदयनराजेंनी पत्रकार परिषदा व गाठीभेटींचा एवढा सपाटा लावला की बोलायची सोय नाही. तेच उदयनराजे ‘आयडिया’ करून बिनविरोध झाले. पुन्हा कुठेच दिसले नाहीत.

मतदानादिवशीही जिल्ह्याच्या कुठल्याच मतदान केंद्रावर उदयनराजेंची ‘सवारी’ नजरेत पडली नाही. उदयनराजे कुठेत तर ‘ढुँढते रह जाओगे!’ जिल्ह्यात बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सगळं असं ढिंच्यांग डिच्यांग सुरू राहिलं आणि एकदाचं मतदान पार पडलं, लोकशाहीच्या नावानं सातारा जिल्ह्यात चांगभलं झालं! (मतदानादिवशी पर्यंतच एवढा मोठा ट्रेलर झाला आहे. निकालादिवशी आणखी वेगळा पिक्‍चर बाहेर येणार आहे!)

गुंग मती बारामतीची; एवढी करामत एकट्या सातारा जिल्ह्याची

अबब… रामराजे व जयकुमार गोरे एक झाले की हो!

भाजपच्या जयकुमार गोरेंचा गट म्हणे राष्ट्रवादीच्या पोळांसोबत!

भाजपचे डॉ. अतुल भोसले सहकारमंत्री बाळासाहेबांच्या मांडवात

चक्‍क येळगावकरच मानत आहेत जयकुमार गोरेंचे आभार

भाजपचे शिवेंद्रराजे राष्ट्रवादीप्रणित उमेदवारांसाठी ठाण मांडून

बिनविरोध झाल्याच्या दिवसापासून उदयनराजे ढुँढते रह जाओगे!

महाविकास आघाडीतल्या शिवसेनेला सहकारी पक्षाचीच टांग

Back to top button