देवमाणूस परत येतोय, दुसऱ्या भागाची पहिली झलक आली समोर | पुढारी

देवमाणूस परत येतोय, दुसऱ्या भागाची पहिली झलक आली समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क

झी मराठी वरील क्राईम थ्रिलर मालिका ‘देवमाणूस’ने १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. पण या मालिकेचा दुसरा भाग येत आहे. ”देवमाणूस २… लवकरच!”, अशी पोस्ट या मालिकेची निर्माती अभिनेत्री श्वेता शिंदे हिने इन्स्टाग्रामवर केलीय. ‘देवमाणूस’ मालिकेने ऑगस्टमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण या मालिकेचा शेवट ज्याप्रकारे केला त्यामुळे प्रेक्षक गोंधळात पडले होते. मालिकेच्या शेवटच्या एपिसोडमध्ये देवमाणूस डॉक्टरचा खरा चेहरा काही सर्वांसमोर आलेला दाखविण्यात आला नाही. एकूणच या मालिकेचा शेवट अर्धवट दाखविण्यात आला. यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली होती. तेव्हाच या मालिकेचा दुसरा भाग येणार असल्याची चर्चा सुरु झाली. तसे संकेत निर्माती अभिनेत्री श्वेता शिंदे हिने दिले होते.

आता या मालिकेचा दुसऱ्या भाग (Devmanus 2) लवकरच येत असल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आलंय. या दुसऱ्या भागाची झलक इन्स्टाग्राम पोस्टमध्ये दाखविण्यात आलीय. त्यात जुना वाडा, डॉ. अजित कुमार देव याच्या दवाखान्याचा फलक दिसतो. श्वेता शिंदे यांच्या पोस्टवर देवमाणूसच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता लागली असल्याचे प्रेक्षकांनी म्हटलंय. पण मालिकेचा शेवट जरा नीट दाखवा असे कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत.

या मालिकेचे ३०० एपिसोड दाखवण्यात आले. यात पैसे आणि दागिन्यांसाठी डॉक्टर एकामागून एक खून करतो. पोलिस त्याला अटक करतात. पण त्याच्यावरील गुन्हे कोर्टात सिद्ध होत नाहीत आणि तो सुटतो. ही लोकप्रिय मालिका सर्वांधिक चर्चेत होती. एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते. पण, त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. देवमाणूस मालिकेच्या पहिल्या भागात बोगस डॉक्टरचे भयानक कारनामे दाखवण्यात आले होते.

अभिनेता किरण गायकवाड याची देवमाणूस मालिकेत मुख्य भूमिका आहे. यातील सरू आज्जी, डिंपल, टोण्या, बज्या, विजय, नाम्या ही पात्रे लोकप्रिय झाली होती. त्यांनी पहिल्या भागात दमदार अभिनय केला.

हे ही वाचा :

 

Back to top button