Karad Politics : पालकमंत्र्यांच्या व्यासपीठावर भोसले- मोहिते | पुढारी

Karad Politics : पालकमंत्र्यांच्या व्यासपीठावर भोसले- मोहिते

कराड : पुढारी वृत्तसेवा : Karad Politics : सातारा जिल्हा बँक निवडणुकीबाबत गुरुवार, 18 नोव्हेंबर रोजी गजानन हौसिंग सोसायटीमधील समर्थ मल्टीपर्पज हॉलमध्ये मेळावा होत आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित या मेळाव्यास यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले हेही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कराड तालुक्यात तब्बल 11 वर्षानी एका नव्या अध्यायास प्रारंभ होत असून तालुक्यात नवी राजकीय समीकरणे उदयास येऊ लागली आहेत.

कराड तालुक्यात 2006 साली नगरपालिका निवडणुकीनंतर डॉ. अतुल भोसले गट आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील गट एकत्र आले होते. मात्र पुढे अडीच वर्षात दोन्ही गटामध्ये तीव्र मतभेद होऊन डॉ. अतुल भोसले यांनी 2009 साली विधानसभा निवडणूक पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात लढवली होती. त्यावेळी तत्कालीन विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट नाकारत ते डॉ. अतुल भोसले यांना बहाल केले होते. मात्र या निवडणुकीत डॉ. अतुल भोसले यांचा पराभव करत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मोठा विजय मिळवला होता.

या विजयानंतर मागील 11 वर्षापासून पालकमंत्री बाळासाहेब पाटील गटाकडून डॉ. अतुल भोसले गटाला प्रत्येक निवडणुकीत तीव्र विरोधास सामोरे जावे लागले होते. चार महिन्यापूर्वी झालेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना निवडणुकीपर्यंत ही परिस्थिती कायम होती. मात्र याच कालावधीत मागील दोन वर्षापासून पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे बंधू जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरूद्ध उघड भूमिका घेत डॉ. अतुल भोसले यांना जाहीरपणे पाठिंबा दिला होता.

कराड तालुका सोसायटी गटात काँग्रेस नेते अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. अतुल भोसले यांचे वडील डॉ. सुरेश भोसले हे प्रथमच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर यावेळी ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांचीही उपस्थिती असणार आहे.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत असले तरी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात नामदार बाळासाहेब पाटील गटाची मोठी राजकीय ताकद आहे. याच ताकदीचा फायदा 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना डॉ. अतुल भोसले यांच्याविरूद्ध झालेल्या लढतीत झाला होता. आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि अ‍ॅड. उदयसिंह पाटील हे दोन्ही गट मागील वर्षभरापासून एकत्र आहेत. या पार्श्वभूमीवर आता भोसले गट आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील गट सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येणार असल्याने तालुक्यात नवी राजकीय समीकरणे उदयास येण्याची शक्यता वर्तवण्यात येऊ लागली आहे.

या मेळाव्यास विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळेच या मेळाव्यातील घडामोडींकडे कराड तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

निमंत्रितामध्ये आमदार पृथ्वीराज चव्हाण…

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित मेळाव्यास उपस्थित असणार्‍या नेत्यांमध्ये काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव आहे. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विजयात पालकमंत्री बाळासाहेब पाटील गटाची मोलाची भूमिका होती. त्याचवेळी अ‍ॅड. उदयसिंह पाटील हे काँग्रेस नेेते असून आमदार चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळेच आता आमदार पृथ्वीराज चव्हाण हे या मेळाव्यास उपस्थित राहणार का ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Back to top button