satara crime : साताऱ्यात राडा; शहर पोलिस ठाण्याला घेराव | पुढारी

satara crime : साताऱ्यात राडा; शहर पोलिस ठाण्याला घेराव

सातारा; पुढारी वृत्तसेवा : satara crime : सातार्‍यातील सदरबझारमध्ये बुधवारी रात्री तुफान राडा झाला. दारुविक्रीतून घरात घुसून मारहाण झाल्याने परिसरात नागरिक संतप्त झाले. यातून एका गटाने तुफान हल्ला चढवत वाहनांची तोडफोड केली. हाणामारी, तोडफोडीची घटनेने सदरबझारमध्ये तणाव निर्माण झाला. दरम्यान, याप्रकरणी संशयितांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सुमारे 50 हून अधिक जणांच्या जमावाने शहर पोलिस ठाण्याला घेराव घातला.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, ही घटना रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बेकायदेशीर दारु विक्री करणार्‍या एका टोळक्याने धुडगूस घातला. घरात घुसून या टोळक्याने तरुणाला दमदाटी करत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या राड्यामुळे परिसरात नागरिक भयभीत झाले. यातूनच टोळक्याने परिसरातील काही वाहनांची तोडफोड करत ती वाहने पाडली.
हा सर्व प्रकार सुमारे अर्धा तास सुरु होता. तोपर्यंत सदरबझारमध्ये नागरिक हळूहळू एकत्र जमू लागली.

दहशतीचे वातावरण केल्याने नागरिकांनी या संतप्त घटनेविरुध्द कठोर कारवाई करण्यासाठी पोलिस ठाणे गाठण्याचा निर्णय घेतला. यामध्ये प्रामुख्याने महिलांचा सर्वाधिक समावेेश होता. रात्री ८.४५ वाजता शेकडोंचा जमाव शहर पोलिस ठाण्यासमोर आल्यानंतर पोलिसांची गडबड उडाली. अचानक जमाव आल्याने पोलिसांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले. मात्र जमाव ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. तोपर्यंत रस्ता पॅक झाला व बघ्यांची गर्दी अधिक वाढली. पोलिसांनी तक्रार घेवून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.

Back to top button